For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘भोजशाला’ अहवाल न्यायालयात सादर

06:14 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘भोजशाला’ अहवाल न्यायालयात सादर
Advertisement

1,700 हून अधिक पुरातन अवशेष, देवतांच्या आढळल्या मूर्ती, सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण

Advertisement

वृत्तसंस्था /धार (मध्यप्रदेश)

मध्यप्रदेशातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थान असणाऱ्या ‘भोजशाला’ परिसराच्या पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याच न्यायालयाच्या आदेशावरून हे सर्वेक्षण भारतीय पुरातत्व विभागाने केले होते. हे स्थान पूर्वापारपासून हिंदूंचे मंदिर असून ते मुस्लीम आक्रमकांनी बळकावून उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे ते हिंदूंना परत देण्याचा आदेश द्यावा अशी याचिका काही हिंदू पक्षकारांनी न्यायालयात सादर केली आहे.

Advertisement

उच्च न्यायालयात 22 जुलैला या अहवालावर सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयाच्या पुढच्या आदेशापर्यंत हा अहवाल गुप्त ठेवावा, असा आदेशही न्यायालयाने हिंदू-मुस्लीम पक्षकारांना दिला आहे. यासंबंधीची याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात हिंदू न्याय आघाडीकडून (हिंदू फ्रंट ऑफ जस्टीस) सादर करण्यात आली आहे. या सुनावणीसंबंधी मोठी उत्सुकता सर्वसामान्यांना आहे.

हिंदूंचे म्हणणे काय आहे...

हे स्थान हिंदूंसाठी पुरातन काळापासून पवित्र आहे. हे स्थान मुस्लीम आक्रमणापूर्वी एक मंदिर होते. त्यामुळे या स्थानावर हिंदूंचा अधिकार असून ते त्यांना परत मिळावे, अशी मागणी करणारी याचिका हिंदू पक्षकारांच्या वतीने त्यांचे विधीज्ञ विष्णू शंकर जैन यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठाकडे सादर केली आहे. हिंदूंच्या या मंदिराचा उपयोग मशिदीप्रमाणे केला जात आहे, असा आक्षेपही या याचिकेत घेण्यात आला आहे. 2003 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने हे स्थान वादग्रस्त असल्याचा निष्कर्ष काढला होता. हा निष्कर्ष पूर्णत: चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचेही प्रतिपादन याचिकेत करण्यात आले आहे. या याचिकेवरुनच उच्च न्यायालयाने या स्थानाचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता.

हिंदूंना केवळ मंगळवारी अनुमती

21 वर्षांपूर्वी प्रशासनाने लागू केलेल्या आदेशानुसार या स्थानी हिंदूंना केवळ मंगळवारी पूजापाठ आणि प्रार्थना करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, हे स्थान पुरातन काळापासून हिंदूंचेच असताना त्यांच्यावर केवळ मंगळवारी पूजा करण्याचे बंधन घालणे अन्यायकारक आहे. हे हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन आहे, असे प्रतिपादनही हिंदूंच्या वतीने त्यांच्या याचिकेत करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयातही...

या प्रकरणी मुस्लीम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र, शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करताना मूळ वास्तूला कोणताही धोका होता कामा नये, असा आदेशही दिला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाने दक्षतापूर्वक सर्वेक्षण केले आहे.

हिंदूंचा पक्ष बळकट...

भारतीय पुरातत्व विभागाने जो अहवाल सादर केला आहे, त्यातील निष्कर्ष हिंदूंचाच पक्ष बळकट करणारे आहेत, असे प्रतिपादन विष्णू शंकर जैन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले. उच्च न्यायालयाने सोमवारी या अहवालाच्या प्रती या प्रकरणातील दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना दिल्या. मात्र, या अहवालातील माहिती उघड केली जाऊ नये, असा आदेशही दिला आहे. या स्थानाचे सर्वेक्षण 1902 मध्येही ब्रिटिशांच्या राजवटीत पुरातत्व विभागाकडून करण्यात आले होते.

अनेक पुरातन अवशेषांचा शोध

भोजशाला हे स्थान मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे 22 मार्च 2024 पासून पुढचे 98 दिवस भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षण केले. या स्थानी हिंदूंची महत्त्वाची देवता वाग्देवी मातेचे मंदिर आहे, असे हिंदूंचे प्रतिपादन आहे. या स्थानाचे सर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन करण्यात आले आहे. जीपीएस आणि ग्राऊंड पेनट्रेटिंग रडार (जीपीआर) यांच्या साहाय्याने आतील भागाचा शोध घेण्यात आला. या स्थानी 1,700 हून अधिक पुरातन अवशेष आढळून आल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या पुरातन अवशेषांमध्ये हिंदू देवदेवतांच्या अनेक मूर्ती आहेत, अशीही माहिती देण्यात आली होती. यामुळे 22 जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल्याचे दिसून येत आहे.

आता सुनावणीकडे लक्ष

ड भोजशाला प्रकरणाचा अहवाल सादर झाल्यानंतर आता सुनावणीकडे लक्ष

ड 22 जुलैला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठात होणार सुनावणी

ड सर्वेक्षण अहवालात आमचा पक्ष भक्कम झाल्याचे हिंदू बाजूचे प्रतिपादन

Advertisement
Tags :

.