भारताचे दोन प्रशिक्षक करारमुक्त
बीसीसीआयकडून मुदतवाढ नाही, घोष नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचे करार संपले असून बीसीसीआय त्यांना कोणतीही मुदतवाढ देणार नाही, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली. आसामच्या सुभदीप घोष हे आता भारताचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचे नाव जाहीर करेल. सैकिया यांनी सांगितले की, दोन किंवा तीन नावांवर चर्चा सुरू आहे. परंतु असे समजते की, भारताच्या महिला आणि अ संघाचे माजी सपोर्ट स्टाफ सदस्य सुभदीप घोष हे दिलीप आणि टेन डोशेट यांची जागा घेणार आहेत. बीसीसीआयने कोचिंग स्टाफमधील बदलांना दुजोरा दिला आहे.
भारतीय पुरूष संघासोबत साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांचा दोन वर्षांचा करार 10 जून रोजी संपला. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, ज्यांना मुळ कार्यकाळ संपल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती, त्यांचाही करार 8 जून रोजी संपला, असे बीसीसीआचे सचिव सैकिया यांनी सांगितले. युनायटेड किंगडममधील भारताचा दौरा संपेपर्यंत बीसीसीआयने या दोघांनाही कायम ठेवले होते. मात्र बीसीसीआय त्यांना कोणतीही मुदतवाढ देणार नाही. करार संपल्यामुळे राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण सचिवांनी दिले.
मुदतवाढ न देण्यामागची कारणे
हे नमूद करणे आवश्यक आहे की, टेन डोशेट यांना स्वत:लाच बाहेर पडायचे होते. कारण गौतम गंभीर यांच्या आग्रहाखातर त्यांना संघात आणले गेले तेंव्हा त्यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचे पद देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या दोन वर्षांत त्यांना कोणतीही विशिष्ट भूमिका देण्यात आली नाही. दिलीप यांच्या बाबतीत सांगायचे तर इंग्लंडमधील 2025 च्या कसोटी मालिकेपूवीं त्यांना मिळालेली एक वर्षाची मुदतवाढ एका वरिष्ठ सुपरस्टारच्या आग्रहामुळे मिळाली होती. मात्र इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची क्षेत्ररक्षणातील कामगिरी सुमार दर्जाची राहिल्याने त्यांच्या कामगिरीबाबत कोणीही समाधानी नव्हते, अशी माहिती मिळाली. युकेमधील अलिकडील व्हाईटबॉल दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर त्यांना आणखी मुदतवाढ मिळणे ही एक चमत्कारिक गोष्ट ठरली असती.
आसामचे माजी खेळाडू भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
संघ व्यवस्थापनातील मोठ्या फेरबदलाचा भाग म्हणून आसाम आणि रेल्वेचे माजी खेळाडू सुभदीप घोष हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत. 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल जिंकली तेंव्हा घोष त्यांच्या साहाय्यक स्टाफचा भाग होते आणि त्यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून नवे प्रशिक्षक कार्यरत होतील.
घोष यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेतही संघाचे प्रशिक्षक होते. अलीकडेच झालेल्या भारत अ संघाच्या लंका दौऱ्यात ते संघव्यवस्थापनाचे भाग होते.