For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या 9 उमेदवारांची सूची घोषित

06:10 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या 9 उमेदवारांची सूची घोषित
Advertisement

राज्यसभेच्या दैवार्षिक निवडणुकीसाठी पक्ष सज्ज

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

या महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या 9 उमेदवारांची प्रथम सूची घोषित केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे नाव या सूचीत असून ते बिहारमधून राज्यसभेत जातील हे निश्चित आहे. राज्यसभेसाठीच्या निवडणुका 16 मार्चला होणार असून स्थानांची संख्या 37 आहे. महाराष्ट्र, ओडीशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 10 राज्यांमधून हे 37 नवे राज्यसभा सदस्य निवडून आणले जाणार आहेत.

Advertisement

या सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक सात जागा महाराष्ट्रातून निवडून येणार आहेत. त्याच्या खालोखाल पश्चिम बंगालमधून सहा जागा आहेत. पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस आणि ओडीशातून बिजू जनता दलानेही त्यांच्या उमेदवारांची सूची प्रसिद्ध केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सूचीत, शिवेश कुमार (बिहार), तेराश गोवल्ला (आसाम), जोगेन मोहन (आसाम), लक्ष्मी वर्मा (छत्तीसगड), संजय माटिया (हरियाणा), मनमोहन समल (ओडीशा), सुजीत कुमार (ओडीशा) आणि राहुल सिन्हा (पश्चिम बंगाल) या आणखी आठ नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.

तृणमूल काँग्रेसचे चार उमेदवार

पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसने चार उमेदवारांच्या नावाची सूची घोषित केली. या सूचीत बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मेनका गुरुस्वामी आणि कोयल मलीक यांचा समावेश करण्यात आला आहे. बिजू जनता दलानेही संतृप्त मिश्रा आणि दत्तेश्वर होता यांची उमेदवारी घोषित केली आहे.

भाजपच्या जागा वाढणार

राज्यसभा निवडणुकांच्या या फेरीनंतर राज्यसभेत भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बळ राज्यसभेत वाढणार आहे. महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत असल्याने या आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार या दोन राज्यांमधून निवडून येणार हे निश्चित आहे. याखेरीज हरियाणा आणि छत्तीसगडमधूनही भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार विजयी होतील, हे त्या राज्यांच्या विधानसभांच्या सदस्यसंख्येवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची ठरत आहे.

Advertisement

.