For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भव्यतेची नाही भक्तीची गरज

06:01 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भव्यतेची नाही  भक्तीची गरज
Advertisement

मुंबईत गणपती आगमनाचा उत्साह सुरू होण्याआधीच एका दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. भुलेश्वर येथे ‘भुलेश्वरचा राजा’ची तब्बल 22 फूट उंच गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मफत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. गणेशोत्सवापूर्वीच गणेशभक्तांच्या उत्सवावर या घटनेने विरजण पडले. या घटनेमागचे नेमके तांत्रिक कारण तपासातून स्पष्ट होईल. मात्र या दुर्घटनेने त्यापलीकडचा एक मोठा प्रश्न समाजासमोर उभा केला आहे तो म्हणजे आपण उत्सव साजरा करतोय की उत्सवाचे प्रदर्शन करतोय? दुसरीकडे या घटनेच्या निमित्ताने मुंबईतील रस्त्यावरील खड्डयांयांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Advertisement

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिकजीवनाचा आत्मा आहे. गणपती म्हणजे केवळ ढोल-ताशे, रोषणाई, भव्य मिरवणूक आणि उंचच उंच मूर्ती नव्हे. गणपती म्हणजे श्रद्धा, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि माणसामाणसांना जोडणारा उत्सव. पण गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे स्वरूप झपाट्याने बदलताना दिसते आहे. मूर्ती किती मोठी? मिरवणूक किती भव्य? डिजे किती मोठा? रोषणाई किती आकर्षक? सेलिब्रिटी कोण? मंडप किती खर्चिक? सोशल मीडियावर व्हिडिओ किती व्हायरल झाला? या सगळ्या आसक्तींपुढे आता भक्ती मागे पडताना दिसत आहे. मुंबईत शनिवारी गणपती आगमनाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेने आता अनेक सवाल उपस्थित केले आहेत, या घटनेनंतर प्रामुख्याने मूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा करण्याची नितांत गरज असल्याचे दिसत आहे. 64 कला आणि 18 विद्येची देवता असणाऱ्या या गणरायाचा उत्सव म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचा केंद्रबिंदूच. या उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कलाकारांसाठी एक पर्वणीच असायची. अनेक कलाकार आजही आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना गणेशोत्सवाचा दाखला देतात. व्याख्यानमाला, विविध स्पर्धा, नाट्या, नृत्य, वक्तृत्व अशा सर्व कलागुणांना या उत्सवात व्यासपीठ मिळत असे. लोकवर्गणीतून चालणारा हा उत्सव आता मात्र प्रायोजकांच्या जीवावर केला जात आहे. गणपतीच्या नावावर मंडळे मोठी झाली, पाद्यपुजन सोहळा, आगमन सोहळा, प्रथम दर्शन ते विसर्जन सोहळा अशा इव्हेंटवर आता गणपती आणि दहीहंडी उत्सव होऊ लागले आहेत. दहीहंडीचे बक्षीस किती मोठे, कार्यक्रमाला कोणता अभिनेता किंवा सेलिब्रिटी येणार, कोणता राजकीय नेता प्रमुख पाहुणा असणार, किती मोठे पोस्टर लागणार, किती गर्दी जमणार या सगळ्याला प्रचंड महत्त्व आले. उत्सवाच्या निमित्ताने समाजाशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते आणि हळूहळू श्रद्धेचा उत्सव हा राजकीय जनसंपर्काचा प्लॅटफॉर्मच बनला. ठाण्यातील राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे राम कदम यांच्या राजकीय आयुष्यातील उंची गाठण्यासाठी दहीहंडी उत्सवाचा मोठा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उत्सवाचा इव्हेंट झाल्याने आता उत्सवाचे स्वऊप बदलले, जाहिरीतींची भव्यता आणि आवाजाची तीव्रता, ही या उत्सवाची ओळख बनू लागली.

दहीहंडीचेही काहीसे असेच झाले आहे. कधीकाळी कृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा, तऊणाईच्या सामूहिक उत्साहाचा आणि परिसरातील एकजुटीचा हा उत्सव होता. मात्र आता अनेक ठिकाणी लाखो ऊपयांच्या बक्षिसांचा, मोठमोठ्या प्रायोजकांचा, राजकीय शक्तिप्रदर्शनाचा आणि गर्दी खेचण्यासाठीच्या स्पर्धेचा भाग बनला आहे. यावर काही निर्बंध किंवा अटी नियम आणण्यासाठी कोणी आवाज उठविल्यास, मग आम्ही काय घरात स्टुलवर चढून दहीहंडी फोडायची का? असा सवाल केला जातो. आमच्याच उत्सवावर मर्यादा का? असेही बोलले जाते. मात्र ज्या घरातील मुलगा किंवा पुरूष या दहीहंडी उत्सवात वरच्या थरावऊन पडून कायमचा अंथरूणाला खिळून आहे, त्यांच्या घरातील लोकांनाच माहीत, सरकार किंवा राजकीय पक्ष किंवा राजकारणी हे स्वत:चा फायदा असल्याशिवाय कोणतीही घोषणा करत नाहीत. त्यामुळे गोविंदाचा विमा उतरवणार, त्यांना सुविधा देणार असे म्हणत मोठ मोठ्या जाहिराती करतात, मात्र एखाद्या गोविंदाला कायमचे अपंगत्व आल्यावर कोणी पुढे येत नाही. गेल्या वर्षी मुंबई, ठाणे तसेच इतर सगळ्याच महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणूका होत्या. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी 2025 च्या दहीहंडी आणि गणेशोत्सवात मोठी राजकीय स्पर्धा बघायला मिळाली. दहीहंडीमध्ये थरांची उंची आणि विक्रमी बक्षिसांपेक्षा गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळाले पाहिजे. गणेशोत्सवात मूर्तीच्या उंचीपेक्षा सुरक्षितता, डिजेपेक्षा संस्कृती, रोषणाईपेक्षा सामाजिक संदेश आणि जाहिरातींपेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची झाली पाहिजे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव राहिला पाहिजे. कारण शेवटी गणपती म्हणजे ‘विघ्नहर्ता’.  उत्सवामुळे भाविकांचा जीव धोक्यात येत असेल तर, आपल्याला स्वत:लाच विचारण्याची वेळ आली आहे, की आपण विघ्नहर्त्याचे स्वागत करतोय की आपल्या दिखाव्यामुळे नवी विघ्ने निर्माण करतोय? लोकांना कोणाची भीती राहीली नाही, लोकांच्या श्रध्देचा, भावनेचा जो मिळेल तसा आपल्या स्वार्थासाठी फायदा घेताना दिसत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी डोंबिवलीतील गणेशमूर्तीकार लोकांकडून आगाऊ पैसे घेऊन मूर्तीचे बुकींग घेऊन एक दिवस आधीच आपली कार्यशाळा बंद कऊन पसार झाला. हे सगळे बघता आता भक्तांची तर सोडाच देवाची भीतीदेखील कोणाला राहिलेली नाही. गणेशोत्सव किंवा दहीहंडी बंद करण्याची गरज नाही, मात्र त्याच्या मूळ संस्कृतीकडे परतण्याची गरज आहे. गेल्या वर्षी 2025 ला माघ महिन्यात येणाऱ्या एका माघी गणेशोत्सव मंडळाला भेट दिली, पाच दिवसाच्या या मंडळाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बघितली, त्या पत्रिकेत धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन आणि उद्बोधन करणारे कार्यक्रम होते. गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण, सायबर चोरांपासून सावधान आणि महत्त्वाचा विषय शेयर बाजारामधील गुंतवणूक या विषयांचा समावेश कार्यक्रम पत्रिकेत होता. ज्या प्रश्नांमुळे भाविकांवर विघ्न येतात, त्याच प्रश्नाचे, समस्यांचे निराकरण होणे हा उत्सवाचा हेतू असला पाहिजे. या उत्सवात श्रद्धा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी बरोबरच सुरक्षितता असावी, राजकारण्यांनी उत्सवात सहभागी व्हावे पण उत्सवाचा मालक बनू नये. मंडळांनी नेत्यांचे स्वागत करावे पण स्वत:ची ओळख राजकीय झेंड्यांमध्ये हरवू नये. आणि भक्तांनीही विचार करावा की, आपण बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतोय की नेत्याच्या शक्तिप्रदर्शनाचा भाग होण्यासाठी?. गणपतीचा उत्सव हा मतांचा ‘इव्हेंट’ नसावा आणि दहीहंडी हा राजकीय ताकदीचा ‘शो’ नसावा. आपण विघ्नहर्त्याचे स्वागत करतोय की आपल्या दिखाव्यामुळे नवी विघ्ने निर्माण करतोय? याचा विचार होण्याची गरज आहे. बाप्पाचे आगमन जल्लोषातच व्हावे पण त्या जल्लोषात कोणाच्याही घरचा दिवा विझता कामा नये.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.