For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लॉटमध्ये पाळले 300 आजगर

06:04 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्लॉटमध्ये पाळले 300 आजगर
Advertisement

वीज बिलामुळे झाला खुलासा

Advertisement

तुमच्या शेजारी राहणारा इसम सामान्य जीवन जगत असल्याचे तुम्हाला दिसून येत असेल, परंतु त्याच्या फ्लॅटमध्ये शेकडो अजगर पाळले जात असले तर तुम्ही काय कराल? चीनमध्ये असाच प्रकार घडला आहे, तेथे एका फ्लॅटमधून 300 हून अधिक अजगर हस्तगत करण्यात आले आहेत. या पूर्ण प्रकरणाचा सुगावा कुणा खबऱ्यामुळे लागला नाही, तर विजेच्या बिलाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

चीनच्या झेजियांग प्रांताच्या ताइझोउ शहरात मार्च 2024 मध्ये एका वृद्ध इसमाला पर्वतीय भागानजीक एक मोठा साप दिसून आला होता. सापाचा रंग आणि आकार पाहून हा या भागात आढळून येणाऱ्या सामान्य प्रजातीचा नसल्याचे वाटते. त्याने त्वरित याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळविली.

Advertisement

वन्यजीव अधिकाऱ्यांनी सापाचे परीक्षण केल्यावर तो अजगर होता हे कळले. ही प्रजाती त्या भागातील मूळ प्रजाती नसल्याचे तज्ञांनी सांगितले. याचबरोबर मार्च महिन्यात सर्वसाधारणपणे साप खुल्या ठिकाणी अधिक सक्रीयही नसतात, अशास्थितीत हा अजगर एखाद्या फार्ममधून पळून आला असावा असा संशय अधिकाऱ्यांना आला.

येथूनच सुरू झाली तपासाची रंजक कहाणी

पोलिसांनी एका साप पाळणाऱ्या प्रोफेशनलचा सल्ला घेतला. अजगरांना जिवंत ठेवण्यासठी सातत्याने गरम आणि आर्द्र वातावरणाची आवश्यकता असते. याकरता तापमान सुमारे 20-30 अंश सेल्सिअस ठेवावे लागते. ज्यामुळे विजेचा वापर सामान्य घरांच्या तुलनेत खूपच अधिक असतो असे या प्रोफेशनलने पोलिसांना सांगितले. या माहितीनंतर पोलिसांनी परिसरातील घरांच्या विजेच्या बिलाचा तपशील तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका फ्लॅटबद्दल अधिकाऱ्यांना संशय आला. हा फ्लॅट गुओ नावाच्या इसमाचा होता. गुओ एकटाच राहत होता, त्याचा विवाह झाला नव्हता आणि त्याच्याकडे कुठलीच नियमित नोकरी नव्हती. तरीही त्याच्या घरात विजेचा वापर असामान्य स्वरुपात अधिक होता.

याप्रकरणी तपास पुढे सरकल्यावर पोलिसांना आणखी एक सुगावा मिळाला. दी नावाचा एक व्यकती अनेकदा गुओच्या घरी ये-जा करत होता. तो नियमित स्वरुपात कूरियर सेंटरमधून पार्सलही उचलत होता. पोलिसांनी पडताळणी केली असता या पार्सल्समध्ये पांढरे उंदीर असल्याचे कळले, ज्यांना ऑनलाइन खरेदी केले जात होते. अशाप्रकारचे उंदीर पाळीव सापांना खाऊ घालण्यासाठी खरेदी केले जातात असे उंदरांच्या विक्रेत्यांनी सांगितले.

याचदरम्यान पोलिसांना गुओच्या सोशल मीडिया अकौंटविषयी कळले. तो वेळावेळी सापांची छायाचित्रे शेअर करत होता. काही पोस्टमध्ये त्यांनी आडून आडून अजर विकण्याचा मुद्दाही नमूद केला होता. दी याने दोन अजगर अन्य एका व्यक्तीला सुमारे 1 हजार  युआनमध्sय विकल्याची माहिती तपासात समोर आली होती.

या घडामोडीनंतर पोलिसांना हे प्रकरण अवैध साप पालन आणि विक्रीचे असल्याचे कळून चुकले. पोलीस पथक गुओच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा आतील दृश्य पाहून अधिकारीही दंग राहिले. फ्लॅटचा जवळपास पूर्ण हिस्सा अजगरांच्या कब्जात होता. एका खोलीत गुओचे वैयक्तिक सामान होते, तर उर्वरित दोन बेडरुम आणि लिव्हिंग रुमला सापांसाठी वापरले जात होते.

शेजारीही अनभिज्ञ

खोल्यांमध्ये प्लास्टिकचे शेकडो बॉक्स एकावर एक ठेवण्यात आले होते. प्रत्येक बॉक्समध्ये एक किंवा त्याहून अधिक अजगर होते. मोजणी पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांनी एकूण 309 अजगर हस्तगत केले आहेत. नंतर या सर्व अजगरांना सुरक्षितपणे एका स्थानिक प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्sय 300 हून अधिक अजगर असल्याची कल्पनाही देखील त्याच्या शेजाऱ्यांना आली नाही.

बालपणापासूनच मला सापांमध्ये उत्सुकता होती, मी 20 14 साली चार अजगर खरेदी केले होते आणि तेव्हापासून सातत्याने त्यांच्या ब्रीडिंगमध्ये काम करत राहिलो. मी वेगवेगळ्या रंगांचे अजगर निर्माण करण्यास सक्षम आहे. जणू मी नवे जीव तयार करत आहे असेच वाटत होते असे गुओने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे.

गुओ आणि त्याचा साथीददार दी यांनी आतापफर्यंत सुमारे 80  अजगर विकल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी दुकानदार देंगलाही अटक केली आहे, ज्याने 2014 साली गुओ याला प्रारंभिक 4 अजगर विकले होते. देंगच्या घरातूनही 47 अजगर हस्तगत करण्यात आले आहेत. या पूर्ण प्रकरणात एकूण 436 अजगर हस्तगत करण्यात आले. ज्यांची अनुमानित किंमत 3 कोटी युआनपेक्षा अधिक आहे. चीनच्या कायद्यानुसार अजगर संरक्षित वन्यजीवांच्या श्रेणीत मोडतो, त्यांची खरेदी, विक्री, पाळणे किंवा परिवहनासाठी सरकारी अनुमती आवश्यक आहे. विना अनुमती हे केल्यास तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

Advertisement
Tags :

.