For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ज्वल रेवण्णांनी मागितली 7 दिवसांची मुदत

06:02 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ज्वल रेवण्णांनी मागितली 7 दिवसांची मुदत
Advertisement

अश्लील चित्रफित प्रकरणी एसआयटीसमोर हजर होण्यासाठी वकिलांमार्फत विनंती : उद्या विदेशातून

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या हासनमधील निजदचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्याची विनंती एसआयटीकडे केली आहे. आपण विदेशात असून भारतात परत येण्यासाठी वेळ हवा आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. एसआयटीने नोटीस बजावताच प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावतीने वकिलांनी एसआयटीच्या प्रमुखांना पत्र पाठविले आहे. हे पत्र प्रज्ज्वल यांनी ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे. ‘सत्य शक्य तितक्या लवकर बाहेर येईल’, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

Advertisement

अश्लील चित्रफित प्रकरणी एसआयटीने मंगळवारी खासदार प्रज्ज्वल यांना नोटीस बजावली आहे. हासन जिल्ह्याच्या होळेनरसीपूर येथील त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाला नोटीस लावण्यात आली आहे. प्रज्ज्वल हे आरोप होताच जर्मनीला गेले आहेत. ते 3 मे रोजी रात्री उशिरा बेंगळूरला परतणार असल्याचे समजते. ते जर्मनीच्या फ्रँकफर्ट दौऱ्यावर असून 3 मेच्या परतीच्या प्रवासाचे तिकीट त्यांनी बूक केल्याचे समजते. प्रज्ज्वल प्रवासी व्हिसावर विदेशात गेले आहेत. या व्हिसाचा कालावधी 90 दिवसांचा आहे. सीआरपीसी कलम 41(अ) नुसार नोटिसीची दखल घेऊन चौकशीला हजर न झाल्यास अटकेची कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना देखील या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली असून ते 4 मे रोजी चौकशी हजर राहणार आहेत.

प्रज्ज्वल यांचे वकील अरुण जी. यांनी एसआयटीच्या प्रमुखांना पाठविले पत्रात सीआरपीसी कलम 41(अ) नुसार बजावलेल्या नोटीसमध्ये 1 मे रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, माझे अशिल बेंगळूरबाहेर प्रवासात आहेत. बेंगळूरला येऊन तुमच्यासमोर हजर होण्यासाठी त्यांना 7 दिवसांची मुदत आवश्यक आहे. त्यांना हजर होण्यासाठी दुसरी तारीख द्यावी, अशी विनंती करत आहे, असा उल्लेख केला आहे.

सत्य बाहेर येईपर्यंत बोलणे अशक्य : डॉ. परमेश्वर

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच. डी. रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात अशा घटना उघडकीस येताच सरकारने एसआयटी स्थापन केल आहे. सत्य बाहेर येईपर्यंत, काहीही बोलणे योग्य नाही. तपास अहवाल लवकर येण्याची सूचना सरकारने दिली आहे. प्रज्ज्वल विदेशात आहेत. आम्ही त्यांचे विमानाचे तिकीट जप्त केले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. फॉर्म 41 मध्ये नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार आरोप असणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी 24 तासांत हजर लागते. हजर न झाल्यास अटक करावी की अन्य कोणती कारवाई करावी, हे एसआयटी अधिकारी ठरवतील, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

एसआयटीकडून तपास होत असल्याने प्रज्ज्वल रेवण्णा यांना भारतात आणावे. देशाच्या कायदानुसार त्यांची चौकशी आणि लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास व्हावा. त्यासाठी प्रज्ज्वल यांचा पासपोर्ट रद्द करावा, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे. प्रज्ज्वल रेवण्णा हे हासनचे खासदार आणि एनडीएचे उमेदवार आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ही बाब आपल्याही ध्यानात आली असेलच. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने तपासही सुरु केला आहे. तपासाचा आदेश येताच प्रज्ज्वल विदेशात रवाना झाले. चौकशी सुरू असल्याने त्यांचा राजतांत्रिक पासपोर्ट रद्द करा किंवा आंतरराष्ट्रीय एजन्सीमार्फत त्यांना देशात आणण्यासाठी सहकार्य करा. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाला सूचना द्याव्यात, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी पत्रात केली आहे.

Advertisement
Tags :

.