For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा हल्ले करण्याची ट्रम्प यांची दर्पोक्ती

02:20 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा हल्ले करण्याची ट्रम्प यांची दर्पोक्ती
Advertisement

वाटाघाटी प्रगतीपथावर असल्याचाही निर्वाळा : इराणकडून मात्र इन्कार

Advertisement

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन, तेहरान

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपण इराणवर हल्ले करू शकतो, अशी दर्पोक्तीची भाषा वापरली आहे. गरज पडल्यास अमेरिका इराणवर पुन्हा हल्ला करू शकते, परंतु लष्करी कारवाईऐवजी त्यांना वाटाघाटीतून तोडगा काढणे अधिक पसंत असल्याचे ते म्हणाले. याचदरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सध्या अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचा दावा केला. इराणच्या या दाव्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.

आम्ही आम्हाला पाहिजे तेव्हा कारवाई करू शकतो, पण मला लोकांना मारायचे नाही. जर आम्ही करारावर पोहोचलो, तर अनेक जीव वाचतील, असे भाष्य ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमधून पत्रकारांशी बोलताना केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष चर्चा सोमवारी मध्यस्थांमार्फत सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि, ही चर्चा कुठे होईल किंवा त्यात कोण सहभागी होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. या चर्चेत होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणचा अणुकार्यक्रम यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

इराणचे परराष्ट्रमंत्री इराकमध्ये दाखल

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी इराकमधील नजफ येथे दाखल झाले. अराघची यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर एक फोटो शेअर करून नजफमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली. त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक किंवा बैठकांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

इराण-ओमान यांच्यात होर्मुझबाबत चर्चा सुरू

होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत ओमानसोबत चर्चा सुरू असून तात्पुरती वाहतूक सुनिश्चित करण्याच्या दिशेने काही प्रगती झाल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी सांगितले. तथापि, केवळ ओमानसोबतच्या करारामुळे ही सामुद्रधुनी खुली होणार नाही. जोपर्यंत अमेरिकेची आक्रमकता सुरू राहील, तोपर्यंत सध्याची परिस्थिती तशीच राहील, असेही त्यांनी स्पष्ट पेले.

Advertisement
Tags :

.