पुणे, नागपूरचे धक्के, शिंदे-फडणवीस संघर्ष!
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल केवळ काही आमदार निवडण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. या निकालाने राज्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे अनेक पदर उघड केले आहेत. भाजपचे वर्चस्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा, शरद पवार यांची खेळी आणि काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची शक्यता अशा अनेक विषयांना या निकालाने नव्याने चर्चेत आणले आहे. पाचपैकी भाजप, शिंदे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यांना अनुक्रमे एक, एक आणि दोन जागा मिळाल्या, तर काँग्रेसने नागपूरमध्ये विजय मिळवला. म्हणजेच महायुतीला दोन, तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. संख्येने छोट्या असलेल्या या निवडणुकीने राज्यातील राजकारणाचे मोठे चित्र समोर आणले आहे.
सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो नागपूर पदवीधर मतदारसंघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय केंद्र असलेल्या नागपूरात भाजपचे सुधाकर कोहळे यांचा काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी 3,271 मतांनी पराभव केला. वंजारी यांना 67 हजार 231, तर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोहळे 4 हजार 294 मतांनी आघाडीवर होते. मात्र पसंतीक्रमानुसार झालेल्या पुढील मतमोजणीत चित्र बदलले. अपक्ष नितेश कराळे यांना मिळालेल्या 24 हजार 249 मतांपैकी दुसऱ्या पसंतीची 8 हजार 727 मते वंजारी यांच्या पारड्यात पडली, तर कोहळे यांना 2 हजार 226 मते मिळाली. याच मतहस्तांतरणाने विजयाचे गणित बदलले. कराळे मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उमेदवाराने घेतलेली मते आणि त्यांचा दुसरा पसंतीक्रम निर्णायक ठरला. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मिळवलेला हा विजय पक्षासाठी केवळ एक जागा नसून राष्ट्रीय राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरला आहे. याठिकाणी सलग दुसऱ्यावेळी भाजपच्या नागपूरकर मतदारांनी आपल्या उमेदवाराला दुसऱ्या पसंतीची मते देऊन मते बाद केली. मुख्यमंत्र्यांसाठी हा मोठा धक्का आहे. त्याचा उद्वेग कोहळे यांच्या वक्तव्यातूनही दिसला.
विशेष म्हणजे नागपूरमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची चर्चा असतानाही अभिजित वंजारी यांनी स्वत:च्या संपर्काच्या आणि मेहनतीच्या जोरावर विजय मिळवला. कराळे यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असतानाही त्यांनी विजय खेचून आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑक्टोबरला चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांचा संदर्भ देत मतपत्रिकेवर मतदान होऊनही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, असा टोला समाजमाध्यमांवर लगावला होता. मात्र त्यावेळी नागपूरची मतमोजणी सुरू होती. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसने नागपूरमध्ये विजय मिळवला. त्यामुळे मोदींच्या राजकीय टीकेला महाराष्ट्रातून अनपेक्षित उत्तर मिळाले. संघाच्या मुख्यालयाच्या शहरात भाजपला सलग दुसऱ्यांदा धक्का बसणे ही पक्षासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघानेही भाजपला असाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा 9 हजार 928 मतांनी पराभव केला. हर्षदा यांना 1 लाख 13 हजार 840, तर स्मिता जाधव यांना 1 लाख 3 हजार 912 मते मिळाली. दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा पराभव केला. गावडे यांना 23 हजार 117 मते मिळाली. अपक्ष सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पुणे पदवीधरमधील पराभवाचे खापर शिंदे शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न भाजपच्या काही मंडळींकडून झाला. मात्र भाजपच्या स्वत:च्या यंत्रणेने नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण पक्षाला करावे लागणार आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात शरद पवारांनी आणखी एक राजकीय धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी अजित पवार गटाचे तीन वेळा विजयी झालेले विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा 18 हजार 124 मतांनी पराभव केला. प्रतापसिंह पाटील यांना 85 हजार 876, तर सतीश चव्हाण यांना 67 हजार 752 मते मिळाली. केवळ बारा ते पंधरा दिवसांच्या प्रचारात 76 तालुक्यांपर्यंत पोहोचत त्यांनी मिळवलेला विजय हा स्थानिक नाराजी, बेरोजगारी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि तरुणांमधील असंतोष यांचे प्रतिबिंब मानले जात आहे. सलग अठरा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या सतीश चव्हाण यांचा पराभव हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव केला. सरनाईक यांना 16 हजार 663, तर पोहरे यांना 8 हजार 636 मते मिळाली. या विजयामुळे शिंदे यांनी भाजपच्या राजकीय वर्चस्वाच्या सावलीत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे दाखवून दिले. भाजपने येथे आपण प्रामाणिक काम केले असा दावा केला आहे.
शिंदेसेनेच्या वाट्यालाही संघर्ष
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या पाचही जागांमध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. या निकालांकडे केवळ पक्षीय विजय-पराभव म्हणून पाहता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे प्रयत्न होत असताना एकनाथ शिंदे यांना आपले स्वतंत्र राजकीय महत्त्व टिकवायचे आहे. 2014 ते 2019 या काळात भाजपबरोबर सत्तेत असतानाही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकत्रित शिवसेनेला दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना होती. तेव्हा या सत्तेत मांडीला मांडी लावून बसू वाटत नाही असे शिंदे म्हणायचे. आज शिंदे स्वत: मुख्यमंत्रीपद भूषवून आलेले आणि पक्षाचे नेतृत्व करणारे असले तरी भाजपच्या राजकीय विस्तारामुळे त्यांच्यासमोर पुन्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे.
शिंदे-फडणवीस संघर्ष
गत आठवड्यात मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपापासून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष चर्चेत आहे तो विधानपरिषद निवडणुकीने अधिक टोकाला गेला. 2014 च्या सत्तेत एकाचवेळी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी व राष्ट्रवादीशी चर्चा आणि बाहेरून पाठिंब्याची खेळी करून ठाकरे आणि सेनेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता. त्याचवेळी राष्ट्रवादीलासुद्धा काही अटींवर त्यांनी वेटिंगवर ठेवले होते. अर्थात भाजप केंद्रीय नेतृत्वही सहभागी होते. त्यानंतर 2019 ची खेळी झाली. तत्पूर्वी आउट घटकाच्या सरकारची पण एक चूणूक दाखवली गेली. नंतर शिवसेनाच फोडून शिंदेंना आपल्या बाजूने घेतले गेले. त्यांना मुख्यमंत्री केले गेले या दरम्यान शिजलेले राजकारण आता उकळ्या फोडून पात्राबाहेर वाफा सोडू लागले आहे. 19 नोव्हेंबरला पंतप्रधान पवारांच्या बारामतीत कार्यक्रमाला येत आहेत. त्यामुळे शिंदेंची अस्वस्थता अजून वाढली आहे.
शिवराज काटकर
