For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीओकेतील आंदोलन जारीच राहणार

06:50 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
पीओकेतील आंदोलन जारीच राहणार
Advertisement

आंदोलकांची स्पष्टोक्ती : पाकिस्तानच्या सैन्याला विरोध कायम

Advertisement

वृत्तसंस्था

रावळकोट

Advertisement

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधात आंदोलन जारी आहे. याचदरम्यान आंदोलकांनी पाकिस्तान सरकारसोबत तडजोड केल्याचे वृत्त फेटाळले आहे. जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीच्या (जेएएसी) नेत्यांनी पाकिस्तान सरकारसोबत कुठल्याही मुद्द्यावर सहमती झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेएएसीच पीओकेत जारी आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. तसेच आगामी दिवसांमध्ये आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करण्यात आली.

सोशल मीडियावर आंदोलनासंबंधी अफवा पसरविल्या जात आहेत, पाकिस्तानी सैन्याकडून याप्रकरणी दुष्प्रचार केला जात आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असली तरीही अद्याप कुठलाही अंतिम करार झालेला नाही. आमचे शांततापूर्ण आंदोलन जारी आहे. कुठलाही निर्णय समितीचे मुख्य सदस्यच औपचारिक स्वरुपात घोषित करतील असे जेएएसीने म्हटले आहे.

नेत्यांच्या मुक्ततेची मागणी

जेएएसीने समर्थकांना एकजूट राहणे आणि 23 जुलै रोजीच्या कार्यक्रमासाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे. 23 जुलै हा दिवस आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जेएएसीने म्हटले आहे. जेएएसीकडून मुजफ्फराबादमध्ये 22 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या शटडाउनचे पूर्ण समर्थन केले आहे. हे शटडाउन जेएएसीचे प्रमुख सदस्य शौकत नवाज मीर यांच्या मुक्ततेच्या मागणीसाठी पुकारण्यात आले आहे. मीर हे सध्या पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या ताब्यात आहेत.

23 जुलैला मोठे आंदोलन

नीलम खोऱ्यातील व्यापाऱ्यांना आवाहन करत जेएएसीचे मुख्य सदस्य राजा इखलाक अहमद यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा आग्रह केला आहे. जेएएसीचे वरिष्ठ नेते उमर नजीर काश्मिरी यांनीही मीरपूर, मुजफ्फराबाद येथील  लोकांना 23 जुलै रोजी आंदोलनासाठी मोठ्या संख्येत बाहेर पडण्याचे आवाहन केले. 23 जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.