पाकला नमवत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
युवा वनडे विश्वचषक : भारताचा 58 धावांनी विजय : सामनावीर कनिष्क चौहानची अष्टपैलू खेळी
वृत्तसंस्था/ बुलावायो
आयसीसी 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक स्पर्धेच्या सुपर सिक्समधील शेवटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 58 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने ब गटात अव्वल स्थानासह उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 252 धावा केल्या, यानंतर विजयी लक्ष्याचा पाकचा डाव 194 धावांत आटोपला. या पराभवासह पाकचे स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले.
भारताने विजयासाठी दिलेल्या 253 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकची सुरुवात खराब झाली. समीर मिन्हास 9 धावा करुन बाद झाला. यानंतर उस्मान खानने संयमी अर्धशतकी खेळी साकारली. उस्मान खान खेळेपर्यंत पाकचा संघ हा सामना जिंकतो की काय असे चित्र असताना टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी पुन्हा एकदा टीम इंडियाला सामन्यात परत आणले. उस्मान खान सर्वाधिक 66 धावा करुन बाद झाला. हमजा जहूरने 42 धावांची खेळी साकारली. कर्णधार फरहान युसुफने 38 धावा केल्या. हे स्टार फलंदाज बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजासमोर सपशेल शरणागती पत्कारली. त्यांचा डाव 46.2 षटकांत 194 धावांत आटोपला. भारताकडून खिलान पटेल आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
प्रारंभी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाने सुरुवातीला सलग 3 विकेट्स गमावल्या. यानंतर वेदांत त्रिवेदीने 68 धावांची खेळी करत विहान मल्होत्राच्या सोबतीने संघाचा डाव सावरला. त्यानंतर अंबरीशने 29 धावा तर अभिज्ञान कुंडूने 16 धावांचे योगदान दिले. तर कनिष्क चौहानने खालच्या फळीत 29 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह 35 धावांची खेळी केली. तर खिलान पटेलने 21 धावांचे योगदान दिले. या जोरावर भारतीय संघाने 49.5 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुल सुभानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 49.5 षटकांत सर्वबाद 252 (वेदांत त्रिवेदी 68, विहान मल्होत्रा 21, अंबरीश 29, कनिष्क चौहान 35, अब्दुल सुभान 3 बळी)
पाकिस्तान 46.2 षटकांत सर्वबाद 194 (हमजा जहूर 42, उस्मान खान 66, फरहान युसूफ 38, खिलन पटेल आणि आयुष म्हात्रे प्रत्येकी 3, कनिष्क चौहान 1-30 बळी).