पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण
मुस्लीम युवकाशी बळजबरीने करविला विवाह
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि विवाहाचे प्रकरण उघडकीस आले आहे. अल्पसंख्याक अधिकार संघटना व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीने या प्रकरणाची निंदा केली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरून गंभीर चिंता व्यक्त करत संघटनेने हिंदू मुलींसोबत सातत्याने अशाप्रकारच्या घटना होत असल्याचा आरोप केला आहे.
इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या पूजाचे अपहरण करत तिचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले आहे. धर्मांतरानंतर तिचे नाव बदलून दुआ फातिमा ठेवण्यात आले आणि तिचा विवाह इम्रान अली या युवकासोबत लावून देण्यात आला. या क्रूर कृत्यामुळे मुलीची ओळख हिरावून घेण्यात आली असून तिने कधीच न निवडलेले जीनव जगण्यासाठी तिला भाग पाडण्यात आल्याचा आरोप व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी संघटनेने केला आहे.
सिंधमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याचार
पूजाच्या परिवाराने याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली, परंतु तेथे त्यांच्या हाती निराशाच लागली आहे. या प्रकरणामुळे सिंधमधील हिंदू मुलींच्या सुरक्षेवरून चिंता वाढली आहे. पाकिस्तानात बळजबरीने धर्मांतराच्या घटना वाढत आहे. खासकरून सिंध प्रांतात ही गंभीर समस्या ठरली आहे. सिंधमध्ये हिंदू परिवार स्वत:च्या मुलींच्या सुरक्षेवरून नेहमीच चिंतेत असतात. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून न्याय मिळत नाही, तसेच न्यायालयाकडूनही दिलासा मिळत नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे.
पोलिसांचे मौन
पूजाच्या बळजबरीच्या धर्मांतरण प्रकरणी सिंध पोलिसांनी कुठलीच टिप्पणी करणे टाळले आहे. याप्रकरणी पारदर्शक तपास व्हावा आणि पीडितांसाठी कठोर सुरक्षा उपाय लागू केले जावेत आणि अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत अशी मागणी संघटनेने केली आहे.
