पाकिस्तानकडून भारतावर वायुनिर्बंध कालावधीवाढ
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारतीय विमानांवरील वायुक्षेत्र निर्बंधांना पाकिस्तानकडून कालावधीवाढ देण्यात आली आहे. आता हे निर्बंध 24 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यांचा कालावधी पुढील आठवड्यामध्ये संपत होता. या निर्बंधांच्या अंतर्गत भारताची नागरी किंवा युद्ध विमाने पाकिस्तानच्या वायूक्षेत्रातून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पाकिस्तानने ही घोषणा बुधवारी त्याचा निर्णय झाल्यानंतर केली आहे.
एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर आणि धर्मांध दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपले वायुक्षेत्र पूर्णत: निर्बंधित केले. त्यानंतर पाकिस्तानने असाच निर्णय घेतला. त्यामुळे तेव्हापासून दोन्ही देशांची वायुक्षेत्रे एकमेकांच्या विमानांसाठी बंद आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या त्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले.
भारताकडून अनेक उपाययोजना
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. ‘सिंदूर अभियान’ ही सर्वात प्रभावी उपाययोजना आहे. या अभियानाद्वारे भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारताच्या अचूक वायुहल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक ठार झाले. भारताने पाकिस्तानशी केलेला सिंधू जलवितरण करारही स्थगित केला आहे. भारतातून पाकिस्तानात वहात जाणाऱ्या नद्यांचे पाणी ही पाकिस्तानची जीवनरेखा आहे. भारताने हे वाहणारे पाणी अडविल्यास पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात जलकोंडी होऊ शकते. सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानची 80 टक्के अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे हा करार पाकिस्तानसाठी महत्वाचा आहे. भारताने तो स्थगित केल्याने पाकिस्तान मोठ्या प्रमाणात अडणचीत आहे.
वायुक्षेत्र निर्बंध म्हणजे काय...
भारत किंवा पाकिस्तान यांच्या भूमीवरील जे वायुमंडल आहे, ते त्या त्या देशाचे वायुक्षेत्र म्हणून ओळखले जाते. एका देशाची नागरी किंवा युद्ध विमाने दुसऱ्या देशावरुन उडणार असतील, तर त्या देशाला त्या दुसऱ्या देशाचे वायुक्षेत्र उपयोगात आणण्यासाठी अनुमती घ्यावी लागते. ज्या देशांमध्ये सामरिक किंवा अन्य प्रकारचा संघर्ष असतो, असे देश एकमेकांना त्यांचे वायुक्षेत्र प्रतिबंधित करण्याची शक्यता असते. वायुक्षेत्र प्रतिबंधित झाल्यास त्या देशावरुन प्रतिबंधित देशाची कोणत्याही प्रकारची विमाने उडू शकत नाहीत. तशी विमाने उडविल्यास ती संबंधित देशाकडून पाडली जाऊ शकतात. त्यामुळे वायुक्षेत्र निर्बंधांचे पालन आवश्यक ठरत असते. हे वायुक्षेत्र निर्बंध आंतरराष्ट्रीय नियमावलीच्या आधारावर लागू केले जात असतात.