For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचा उठाव

06:25 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनतेचा उठाव
Advertisement

भारतात विलीन होण्यासंदर्भात झळकली पोस्टर्स

Advertisement

वृत्तसंस्था/ मुजफ्फराबाद

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लोकांनी पाकिस्तानी पोलीस आणि प्रशासनाच्या क्रूरतेच्या विरोधात उठाव केला आहे. तर पोलिसांनी येथील शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या लोकांवर लाठीमार करत गोळीबार चालविला आहे. पोलीस-प्रशासनाच्या या दडपशाहीत एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर संतप्त जमावाने एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव घेतला आहे.

Advertisement

मुजफ्फराबाद आणि रावळकोटमध्ये स्थानिक लोकांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत अनेकदा झटापट झाली आहे. तेथील जनतेने केलेला उठाव पाहता पाकिस्तान या भूभागावरील स्वत:ची पकड गमावत असल्याचे संकेत मिळत आहेत. या भूभागावर पाकिस्तानने दशकांपासून अवैधप्रकारे कब्जा केला आहे. रावळकोटमध्ये पीओकेला भारताला विलीन करण्याची मागणी करणारी पोस्टर्स मोठ्या संख्येत झळकली आहेत. पीओकेत या निदर्शकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूराचा मारा करण्यात आल्यावर लोकांमधील संतापात भर पडली आहे. जमावाने पाकिस्तानी पोलिसांसमवेत सैन्याची वाहने देखील पेटवून दिली आहेत.

जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी अॅक्शन कमिटीकडून या निदर्शनांची सुरुवात करण्यात आली होती. कमिटीने पाकिस्तान सरकारवर फेब्रुवारीमध्ये झालेल्या कराराचे पालन न करण्याचा आरोप करत पीओकेत ‘शटर डाऊन आणि चक्काजाम’चे आवाहन केले होते. स्थानिक लोकांच्या वीज बिलांवर आकारण्यात येणाऱ्या ’अन्यायी’ कराला कमिटी विरोध करत आहे. याप्रकरणी ऑगस्ट 2023 मध्ये कमिटीने आंदोलन केले होते. लोकांना जलविद्युत ऊर्जेच्या उत्पादन खर्चानुसार वीज प्रदान केली जावी अशी कमिटीची मागणी आहे.

परंतु आता ही निदर्शने पीओकेच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फैलावली आहेत. लोक आता पाकिस्तानी पोलीस आणि सैन्याकडून होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. दोन अल्पवयीन मुलींच्या मृत्यूनंतर या निदर्शनांना उग्र स्वरुप मिळाले आहे. लाठीमार आणि अश्रूधुराच्या संपर्कात आल्याने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीओकेतील 10 जिल्ह्यांमध्ये तीव्र निदर्शने सुरु झाली आहेत. शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करणाऱ्या लोकांवर अश्रूधुराचा मारा करण्याचा आदेश देण्यात आल्यावर पीओकेच्या साहाय्यक आयुक्ताला स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली आहे.

Advertisement

.