परवीन हुडा, अंकुश पांघल सुवर्णपदकाच्या फेरीत
वृत्तसंस्था, निशिओ (जपान) : भारताच्या परवीन हुडा (65 किलो) आणि अंकुश पांघल (80 किलो) यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे दोघांनाही आता सुवर्णपदकासाठी लढण्याची संधी मिळाली आहे.
परवीन हुडाने 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शू हिच्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह परवीनने अंतिम फेरी गाठत भारताच्या पदकाच्या आशा आणखी उंचावल्या. यानंतर 80 किलो वजनी गटात अंकुश पांघलने शानदार पुनरागमन करत उझबेकिस्तानच्या विद्यमान 75 किलो विश्वविजेत्या फाझलिद्दीन एर्किनबोएव याचा 4-1 असा पराभव केला. सुऊवातीला पिछाडीवर असलेल्या अंकुशने नंतर आक्रमक बॉक्स्ंिाग करत सामना आपल्या बाजूने वळवला आणि सुवर्णपदकाच्या लढतीत स्थान निश्चित केले.
मात्र अनुभवी भारतीय बॉक्सर नरेंदर बेरवाल याला 90 किलोवरील वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या विद्यमान सुपर हेवीवेट विश्वविजेत्या आयबेक ओरलबाय याच्याकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नरेंदरला कांस्यपदक मिळाले. 2023 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही नरेंदर उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. त्यामुळे त्याने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
परवीन ही आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बॉक्सिंगमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची तिसरी महिला बॉक्सर ठरली आहे. यापूर्वी महान एम.सी. मेरी कोमने 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते, तर लव्हलिना बोर्गोहेनने मागील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. भारतीय बॉक्स्ंिाग संघाने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंतच मागील आवृत्तीतील चार पदकांचा आकडा ओलांडला आहे. सहा भारतीय बॉक्सर पदकाच्या फेरीत पोहोचले असून, परवीन हुडा आणि अंकुश पांघल आता सुवर्णपदकासाठी रिंगमध्ये उतरतील.