पंतप्रधान मोदी यांची केली क्षमायाचना
15 वर्षांच्या मुलीकडून अपशब्दांसंबंधी पश्चात्ताप
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेने प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात केलेल्या आंदोलनात भाग घेतलेल्या एका 15 वर्षांच्या मुलीने आता पश्चात्ताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधात या मुलीने त्या आंदोलनात अपशब्द उच्चारले होते आणि अर्वाच्य शब्दांमध्ये त्यांची अवमानना केली होती. तथापि, आता त्यांच्याकडे तिने क्षमायाचना केली असून माझी ही प्रथम चूक होती आणि ती अंतिम चूक असेल, अशा शब्दांमध्ये तिने आपली भावना व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पदत्याग केलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पोलीस यांच्या संदर्भात या आंदोलनात अनेक युवकांनी आणि समाजकंटकांनी अत्यंत बीभत्स, अश्लील आणि उच्चारताही येणार नाही अशा शब्दांमध्ये टिप्पणी केल्या होत्या. तसेच अनेक अवमानजक रील्सही करुन त्यांना प्रसिद्धी देण्यात आली होती. तथापि, तो उन्माद ओसरल्यानंतर आता हे युवक आणि युवतींना आपल्या कृत्यांच्या परिणामांची जाणीव होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक युवक-युवतींनी क्षमायाचना करत असल्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करण्यास प्रारंभ केला आहे. तर काही जणांनी लेखी क्षमायाचनापत्रे प्रसिद्ध केली असून ती पाठविण्यातही आली आहेत. त्या या 15 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
अन्य लोकांच्या प्रभावामुळे...
‘मी जे उद्गार काढले, ते क्षमा करण्यासारखे नाहीत, याची आता मला जाणीव झाली आहे. मला आता स्वत:ची लाज वाटू लागली आहे. मी साऱ्या देशाची क्षमा याचना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला क्षमा करावी अशी मी विनंती करत आहे. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर मी अन्य लोकांच्या प्रभावाखाली आले होते. त्यामुळे मी अशा प्रकारचे वर्तन केले. आता मला माझ्या कृत्याचा मनापासून पश्चात्ताप होत असून ही माझी पहिली आणि अखेरची चूक आहे. यापुढे मी असा प्रमाद करणार नाही, असे तिने क्षमापत्रात स्पष्ट केले आहे. अशाच प्रकारची क्षमापत्रे इतर अनेक युवक आणि युवतींनीही प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केल्याने आता या संपूर्ण आंदोलनाची वेगळीच पार्श्वभूमी स्पष्ट होत आहे.
