न्यूझीलंड संघाचे नवे प्रशिक्षक रॉब वॉल्टर
वृत्तसंस्था/वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी रॉब वॉल्टर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट न्यूझीलंडने केली आहे. न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघाला आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रॉब वॉल्टर हे नवे प्रशिक्षक लाभणार आहेत. यापूर्वी गॅरी स्टेड यांच्याकडे ही जबाबदारी होती.
2023 च्या जानेवारीपासून ते 2025 च्या एप्रिलपर्यंत रॉब वॉल्टर हे द. आफ्रिका पुरुष क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. द. आफ्रिकेच्या वनडे आणि टी-20 संघाला त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. रॉब वॉल्टर आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीमध्ये न्यूझीलंडमधील ओटॅगो प्रोविन्स संघाला पाच वर्षे प्रशिक्षण देत होते. 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच या वर्षीच्या प्रारंभी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या द. आफ्रिका संघासाठी वॉल्टर हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. 2018 साली गॅरी स्टेड यांची न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. यांनी न्यूझीलंडच्या तीन विविध संघांना मार्गदर्शन केले होते. आता न्यूझीलंडचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तिरंगी टी-20 मालिका खेळविली जाणार असून द. आफ्रिका हा तिसरा संघ आहे. या तिरंगी मालिकेनंतर द. आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे.