For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये मृतांचा आकडा 550 पार

06:58 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये मृतांचा आकडा 550 पार
Advertisement

आणखी एक धरण फुटले, अद्यापही 1,500 बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमध्ये महापुराचे थैमान अद्यापही होत असून आतापर्यंतच्या माहितीनुसार 552 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अद्यापही 1,500 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 319 मारतीय पर्यटकांचा समावेश आहे. नव्या वृत्तानुसार नेपाळ-तिबेट सीमेनजीक आणखी एक सरोवर (धरण) फुटले आहे. हे सरोवर चोचेन आणि पुरेपू या नद्यांच्या संगमानजीक होते. ते फुटल्याने या नद्यांचे, तसेच त्रिशुली नदीचे पाणी वाढले आहे. तथापि, बुधवारच्या तुलनेत ही स्थिती कमी तीव्र आहे. चीन आणि नेपाळने काही काळापुरते बचावकार्य थांबविले.

Advertisement

संपूर्ण पूरग्रस्त भागात लेव्हल-4 ची दक्षता घोषित करण्यात आली आहे. आणखी एकदा महापूर येण्याची शक्यता गृहित धरुन शक्य तितक्या लोकांना सुरक्षित स्थानी पोहचविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. नद्यांपासून कमीत कमी एक किलोमीटर अंतर राखावे, अशी सूचना लोकांना करण्यात आली आहे.

दीड हजार जणांना वाचविण्यात यश

नेपाळ, भारत आणि चीन यांच्या साहाय्यता पथकांनी आतापर्यंत 1 हजार 500 हून अधिक लोकांना आतापर्यंत वाचविले आहे. वाचलेल्या काही जखमींवर उपचार केले जात आहेत. वाहून गेलेल्यांची नेमकी माहिती आणि संख्या मिळणे कठीण झाल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबेच्या कुटुंबे वाहून गेली आहेत. शोधकार्यही काही काळापुरते थांबविण्यात आले. मात्र, तीन तासांच्या खंडानंतर मदतकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. आपदा साहाय्यता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.

319 भारतीय नागरिक बेपत्ता

आतापर्यंतच्या वृत्तानुसार या नैसर्गिक आपत्तीत 319 भारतीय बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्याशिवाय भारतीय वंशाच्या पण भारताचे नागरिक नसलेल्या 100 लोकांशीही संपर्क होऊ शकलेला नाही. ही माहिती भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. पूरगस्त क्षेत्रातून वाचविण्यात आलेले 21 भारतीय नागरिक काठमांडूहून शुक्रवारी दिल्लीत पोहचले आहेत. त्याआधी त्रिशुली जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 63 भारतीय कामगारांचे प्राण वाचविण्यात आले होते. तेही भारतात पोहचले आहेत. तर चीनमध्ये अडकलेले 96 भारतीय सुखरुप नेपाळमध्ये पोहचले आहेत. त्यांना भारतात आणण्याची प्रक्रिया केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महापुराच्या संकटात भूकंपाची भर

महापुराच्या संकटातून बाहेर पडण्याची धडपड नेपाळ करीत असताना, चीनच्या सिचुआन प्रांतात 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने चिंतेत भर पडली आहे. या भूकंपामुळे नेपाळ-तिबेट सीमेवर पुन्हा धोका वाढला आहे. परिणामी, पूरग्रस्त भागातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. तसेच त्रिशुली नदीचा जलस्तर वाढण्याचा धोका असल्याने तिच्या तीरावरच्या लोकांना पुन्हा तेथून हटविण्यात आले आहे. सुरक्षित छावण्यांमध्ये हजारो लोकांनी आसरा घेतला आहे.

साहाय्यता नको, पैसे द्या

आम्हाला साहाय्यतेची आवश्यकता नसून पैशांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नेपाळचे नेते बालेन शाह यांनी केले आहे. साहाय्यता हा केवळ वरवरचा आणि तात्कालीक उपाय आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य दिल्यास आम्ही पूरप्रवण भागात स्थायी व्यवस्था निर्माण करु शकू, असे त्यांचे म्हणणे आहे. पण सध्या नेपाळकडे जगभरातून साहाय्यता सामग्रीचा ओघ येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 लाख डॉलर्सचे (साधारणत: साडेचार कोटी रुपये) अर्थसाहाय्य पूरग्रस्तांसाठी घोषित केले आहे. ब्रिटन आणि फ्रान्स यांनीही साहाय्य पाठविले आहे, अशी माहिती नेपाळने दिली.

नेपाळमध्येच फुटली हिमनदी

नेपाळवर ओढवलेले हे संकट नेपाळच्याच उंचावरच्या भागातील हिमनदी फुटल्याने निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन चीनने केले आहे. हिमनदी फुटणार असल्याची माहिती चीनला असूनही त्याने ती नेपाळला वेळेवर दिली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जावित आणि वित्त हानी झाली, असा आरोप केला जात आहे. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर चीनने नेपाळवरच उत्तरदायित्व ढकलल्याचे दिसून येते.

नदीच्या प्रवाहासमवेत मृतदेह भारतात

नेपाळहून भारतात येणाऱ्या नदीसमवेत या महापूर घटनेतील काही मृतदेह वाहून आलेले आहेत. त्यांची संख्या 25 आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असून, ते सर्व नेपाळी नागरिक असावेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

महापुरामुळे हानी आकड्यांमध्ये...

आतापर्यंत मृत : 552

बेपत्ता विदेशी नागरिक : 537

तिबेटमध्ये बेपत्ता विदेशी नागरिक : 260

सर्वाधिक मृत चितवनमध्ये : 221

Advertisement
Tags :

.