For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये जलप्रलय

06:58 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये जलप्रलय
Advertisement

महापुरात जवळपास 200 भारतीय बेपत्ता : तिबेटमध्ये हिमनदी फुटल्यामुळे 500 हून अधिक नागरिक गेले वाहून,

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळच्या रासुआ जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुरात 500 हून अधिक लोक वाहून गेल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत 200 हून अधिक भारतीय बेपत्ता झाले आहेत. त्यांच्यापैकी 50 हून अधिक जण अनिवासी भारतीय आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. हिमनदी फुटल्यामुळे पाण्याचा मोठा लोंढा अकस्मात पर्वतांवरून नदीत आल्याने ही दुर्घटना घडली. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. तथापि, सततच्या जलवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या नैसर्गिक आपत्तीत बुधवारी सायंकाळपर्यंत 47 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली होती. तथापि, त्यानंतरही मदत व बचावकार्याला वेग देण्यात आला असून मृतांचा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

हिमनदी फुटल्यामुळे भोटे कोशी नदीला अचानक महापूर आला. अल्पावधीतच नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे नदीतटावरील अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि वाहून गेल्या. आसपासच्या मार्गांवरील वाहनेही पुरामुळे वाहून गेली. ध्यानीमनी नसताना घडलेल्या या घटनेमुळे लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. बेपत्ता झालेल्या लोकांपैकी अनेकजण पर्यटक आहेत, तर काहीजण स्थानिक नागरिक आहेत, असे स्पष्ट होत आहे. ही दुर्घटना नेपाळ-तिबेट सीमारेषेवर बुधवारी सकाळी अकरा वाजता या वेळेत घडली.

47 मृतदेह सापडले

महापुरामुळे सखल भागातील रासुआगधी-तिमोरे या भागात प्रचंड प्रमाणात पाणी भरले. त्यामुळे या भागाचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. याच भागात या दिवसांमध्ये पर्यटक हिमालयीन पर्जन्यवृष्टी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्याचवेळी हा महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली असावी असे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत याच भागात 47 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये काही भारतीयांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तथापि, रात्री उशिरापर्यंत मृतांविषयीची नेमकी माहिती स्पष्ट झाली नव्हती. शेकडो लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.

सुरक्षा सैनिकही बेपत्ता

या आपत्तीत 80 हून अधिक सुरक्षा सैनिकही वाहून गेले आहेत. त्यांचाही शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या सुरक्षा सैनिकांमध्ये नेपाळचे 44 भूसेना सैनिकही आहेत, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शिशीर खानल यांनी दिली आहे. त्यांनी सध्या होत असलेल्या नेपाळच्या लोकप्रतिनिधीगृहातही हा मुद्दा उपस्थित झाला असून सरकारने आतापर्यंत हाती आलेली माहिती सभागृहाला दिली आहे. नेपाळ प्रशासनाची बचावपथके युद्धपातळीवर काम करत आहेत.

त्रिशुली नदीलाही महापूर

रासुवा भागातील त्रिशुली या नदीलाही या घटनेमुळे अचानक महापूर आला आहे. यामुळे धाडिंग भागात 6 जणांचा, तर नुवाकोट येथे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पुराचा धोका अद्याप टळला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तिबेटच्या प्रशासनाने नेपाळच्या प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या हिमनदीतून अद्यापही पाण्याचा प्रवाह वाहत आहे. नदीच्या परिसरातील सरोवर अद्यापही रिकामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे पूर लवकर ओसरण्याची शक्यता कमी आहे. s

भारतीयांची माहिती घेण्याचे प्रयत्न

या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या भारतीयांची माहिती मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावास सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जे वाचलेले भारतीय आहेत, त्यांच्या साहाय्याने बेपत्ता भारतीयांची माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

पंतप्रधान मोदी नेपाळच्या संपर्कात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेपाळचे नेते बालेन शाह यांच्याशी संपर्क केला आहे. नेपाळला या आपत्तीच्या निवारणासाठी शक्य तितके सर्व साहाय्य केले जाई&ल. भारताची आपदा निवारण पथके सज्ज आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी नेपाळची यंत्रणा प्रयत्न करीत आहे. भारतानेही साहाय्य देऊ केले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. भारताचे गृहमंत्री अमित शाह हे देखील दुपारपासून नेपाळच्या प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

नेपाळच्या प्रशासनाची माहिती

बुधवारी रात्री उशिरा नेपाळच्या प्रशासनाने दुर्घटनेतील हानीची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार आतापर्यंत एकंदर 384 पर्यटक बेपत्ता आहेत. त्यांच्यातच भारतीयांचा समावेश आहे. 291 विदेशी नागरिक बेपत्ता असून नेपाळचे 97 नागरिकही बेपत्ता आहेत. नेपाळ प्रशासनाने साहाय्यासाठी आणि संपर्कासाठी काही विशेष दूरध्वनी क्रमांकही लोकांना उपलब्ध करुन दिले आहेत.

अनेक वीज प्रकल्प धोक्यात

या महापुरामुळे नेपाळमध्ये निर्माणाधीन अवस्थेत असणारे अनेक जलविद्युत प्रकल्पही धोक्यात आल्याचे वृत्त आहे. कार्यरत असणाऱ्या आठ प्रकल्पांधील वीज निर्मिती थंडावली आहे. त्यांची एकंदर वीजनिर्मिती क्षमता 354 मेगा वॅट इतकी आहे. तसेच निर्माणाधीन असणारे 5 प्रकल्प आहेत, अशी माहिती देण्यात आली. नेपाळच्या रसुवा, नुवाकोट, धाडिंग, गोरखा, लमजुंग आणि तनहुन (गंडक नदीचे पाणलोट क्षेत्र), तसेच दोलखा आणि सिंधुपलचोक (कोसी नदीचे पाणलोट क्षेत्र) या भागांना अचानक येणाऱ्या पुराचा उच्च धोका आहे. कोसी, बागमती आणि गंडक नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील इतर अनेक भागांना मध्यम धोका आहे.

बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा

बुधवारी सकाळी बिहारच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळमध्ये पुरामुळे मोठा विध्वंस झाला. याचदरम्यान, बिहारमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी बिहारचे मुख्य सचिव प्रत्याय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. संबंधित जिह्यांचे जिल्हाधिकारी (डीएम) आणि एसपी/एसएसपी (एसएसपी) देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. गंडक नदीच्या काठावरील जिह्यांमध्ये संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. बेतिया, मोतिहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली येथे विशेष दक्षता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, सीतामढी, शिवहार आणि इतर संवेदनशील जिह्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नदीतील पाण्याची पातळी, बंधारे, सखल भाग, पूल आणि इतर असुरक्षित भागांवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि स्थानिक समुदायाला वेळेवर सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोठ्या हानीचा संभव

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. तसेच अनेक घरे-इमारतींसह वाहने आणि इतर संपत्तीची प्रचंड हानी झाली असून हे नुकसान भरून न येणारे आहे. आता या दुर्घटनेनंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून भारताचीही नेपाळला साथ मिळत आहे. नेपाळच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची हा पुरामुळे मोठी हानी झाली आहे.

Advertisement
Tags :

.