नेपाळमधील निसर्ग कोप !
अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाचा गांभीर्याने विचार न करता जी काही बांधकामे उभारली जातात त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व प्रकारामुळे निसर्ग आपले रौद्ररूप दाखवितो. भारताचा शेजारी म्हणून भारत, नेपाळला प्रत्येक संकटावेळी मदत करीत असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट नेपाळच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून सर्व तऱ्हेची मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती ही ठरलेलीच आहे. दरवर्षी काही ना काही नैसर्गिक आपत्ती या देशावर कोसळते. बुधवारी तिबेटमधून आलेल्या अचानक पुरामुळे नेपाळच्या रसूआ जिह्यात जो प्रचंड विध्वंस झाला त्यात माणसे गेली, वाहने गेली, मालमत्ता तर काही विचारूच नका. असंख्य जीव यामध्ये वाहून गेले. भौगोलिकदृष्ट्या देखील फार मोठे बदलही त्यातून झालेले आहेत. तिबेटमध्ये बहुदा ढगफुटी तरी झाली असेल किंवा बर्फाचे डोंगर खाली कोसळले असावेत. यामागील खरे कारण समजायला काही वेळ लागेल. परंतु या घटनेत बरीच माणसे वाहून गेली. इमारती कोसळल्या. घरे पूर्णत: गेली. एवढेच नव्हे तर जलविद्युत प्रकल्प देखील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. नेपाळमधील अनेकजण गेले. भारतातून गेलेले असंख्य पर्यटक तथा नेपाळमधील मंदिरांना भेट देण्यास गेलेलेही वाहून गेले. ही दुर्घटना फार भयानक आहे. नेपाळ भारताच्या शेजारीच असल्यामुळे तिथे ज्या काही नैसर्गिक आपत्ती येतात तिचा परिणाम भारतावर होत असतो. नेपाळमधील रसूआ जिह्यात प्रचंड विध्वंस झाल्याचे सांगण्यात आले आणि तेथील बोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली विलक्षण वाढ समजण्याच्या पलीकडे जाऊन अचानक आलेला महापूर हा तापदायक आहे. नेपाळमधील ही नदी पुढे बिहारमधील कोशी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे तेथे जी काही दुर्घटना घडली ती सारी या कोशी नदीमध्ये येऊन मिळेल आणि तिथेच मोठ्या प्रमाणात पूर येणार त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात माती देखील वाहून येईल. ही नैसर्गिक आपत्ती कोणत्याही देशावर, कधीही कोसळू शकते. नेपाळमध्ये या अगोदर आलेल्या भूकंपामुळे शेकडो माणसे मरण पावली होती तसेच प्रचंड प्रमाणात घरे, इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. दरवर्षी नेपाळमध्ये महापूर ठरलेले आहेत, मात्र बुधवारी आलेला महापूर हा अति भयानक होता आणि पाहता पाहता पूर प्रचंड आक्रमक बनला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात माती, घरे, झाडे कोसळली. अनेकजण आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अनेकजण आपले प्राण वाचवू शकले नाहीत. भारताचा शेजारी म्हणून भारत, नेपाळला प्रत्येक संकटावेळी मदत करीत असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट नेपाळच्या पंतप्रधानांशी संपर्क साधून सर्व तऱ्हेची मदत देण्याचे आश्वासन दिले. निसर्गाचा हा कोप कशामुळे झाला हे देखील पाहणे गरजेचे आहे. अलीकडे एल नीनोचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की काही ठिकाणी पाऊस अतिशय कमी पडला होता तर काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस पडून गेला. एका बाजूला पाऊस नसल्यामुळे शेती करपून जाते आणि दुसऱ्या बाजूला महापूर आलेला दिसतो. नेपाळमधील घटना ही नेपाळमुळेच झालेली आहे, अशातला भाग नाही तर तिबेटमध्ये बर्फाचे डोंगर कोसळलेले आहेत, शिवाय काही भागात झालेली ढगफुटी याचे सारे परिणाम नेपाळमधील नद्यांवर झालेले आहेत. त्यामुळे अचानक पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात वाढते आणि त्यातून ही नैसर्गिक आपत्ती अनेकांना बेहाल करून गेलेली आहे. मात्र या दुर्घटनेमुळे भारतातील सुमारे 150 माणसे त्यात मरण पावतील असा जो अंदाज आहे तो देखील फार गंभीर आहे. निसर्गासमोर कोणाचेही काही शहाणपण चालत नाही हेच खरे. मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे उद्योग, मोठ्या प्रमाणात जंगले तोडून त्या ठिकाणी इमारती उभारल्या जातात, त्याचबरोबर अनेक उद्योगांमध्ये प्रचंड प्रमाणात जी ऊर्जा तयार केली जाते त्याचाही हवामानावर गंभीर परिणाम होतो. त्याचे पडसाद जगात कुठे ना कुठेतरी उमटत राहतात. उत्तराखंड हे असे राज्य आहे जे डोंगराळ आहे आणि त्याच ठिकाणाहून गंगा नदी सुरू झालेली आहे. उत्तराखंडमध्ये देखील दरवर्षी नैसर्गिक आपत्ती उच्छाद मांडते. महापूर येणार, उच्छाद मांडणार याची कोणाला कल्पना नसते, प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्तीमधून आपण बरेच काही शिकू शकतो. अलीकडच्या काळात पर्यावरणाचा गांभीर्याने विचार न करता जी काही बांधकामे उभारली जातात त्यातून होणारा निसर्गाचा ऱ्हास या सर्व प्रकारामुळे निसर्ग आपले रौद्ररूप दाखवितो. अलीकडच्या काळात भूकंपांची संख्या वाढत आहे ही देखील गंभीर बाब आहे. नैसर्गिक आपत्ती आणि नैसर्गिक संकटे आल्यानंतर आपण थोडाफार निसर्गाचा विचार करतो आणि मग येरे माझ्या मागल्या प्रमाणे तेही विसरून जातो. भविष्यात भारताला, नेपाळला नैसर्गिक आपत्ती संदर्भात आपली यंत्रणा कायमस्वरूपी सज्ज ठेवावी लागेल. पावसाळ्याच्या दिवसात महापूराची भीती, उन्हाळ्याच्या दिवसात बर्फ कोसळण्याची भीती आणि त्यातून एकातून एक निसर्ग रौद्ररूप धारण करतो. नेपाळमध्ये जे संकट उभे आहे त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.