For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दागिने चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

07:10 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दागिने चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
Advertisement

कुडची पोलिसांकडून सोलापूरच्या युवकाला अटक

Advertisement

   त. भा. प्रतिनिधी, वार्ताहर

बेळगाव, कुडची : चिंचली, ता. रायबाग येथील ओढ्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या महिलेचे दागिने व रोकड असलेली बॅग पळविल्याच्या आरोपावरून सांगोला, जि. सोलापूर येथील एका युवकाला कुडची पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 3 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

राहुल सवाईलाल गौड, रा. पारी, ता. सांगोला, जि. सोलापूर असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ, कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक प्रीतम नाईक, पी. ए. माने, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आर. साळुंके, पी. एल. खवटगोप्प, ए. ए. शांडगे, अनिल पाटील, बी. एल. होसट्टी, एम. बी. पाटील,  एस. एस. फरनाकर व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर आदींनी ही कारवाई केली आहे.

निडोणी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर येथील सुनंदा महादेव मायाप्पगोळ यांनी 29 जून रोजी कुडची पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. श्री मायाक्का देवीच्या दर्शनासाठी आले असता सुनंदाची आई शांता या ओढ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या. त्याआधी एक तोळ्याची बोरमाळ, एक तोळ्याचे मंगळसूत्र, अंगठी, चांदीचा डाब, 5 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, आधारकार्ड असा एकूण 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली पिशवी सुनंदा यांच्याकडे दिली होती.

आई आंघोळ करताना पिशवी बाजूला ठेवून सुनंदा अगरबत्ती पेटवत असताना दागिने व रोकड असलेली पिशवी पळविण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून शनिवारी 4 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील युवकाला अटक केली असून त्याच्याजवळून बोरमाळ व मंगळसूत्र असे सुमारे 3 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या राहुल सवाईलाल गौड याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.