For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरंगी वनडे मालिकेत पाक विजेता

06:44 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिरंगी वनडे मालिकेत पाक विजेता
Advertisement

अंतिम सामन्यात लंकेवर 3 गड्यांनी विजय, शतक नोंदवणारा, फखर झमान सामनावीर : अराफत मिनहास मालिकावीर

Advertisement

वृत्तसंस्था, लाहोर

तिरंगी वनडे मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात यजमान पाकिस्तानने लंकेचा 9 चेंडू बाकी ठेऊन 3 गड्यांनी पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकाविणारा सलामीचा फलंदाज फखर झमान ‘सामनावीर’ ठरला. तर पाकच्या अराफत मिनहासची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement

या अंतिम सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. कमिंदू मेंडीसच्या दमदार शतकाच्या जोरावर लंकेने 50 षटकात 8 बाद 325 धावा जमवित पाकला विजयासाठी 326 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पाकने 48.3 षटकात 7 बाद 331 धावा जमवित आपला विक्रमी विजय नोंदविला.

लंकेच्या डावामध्ये सलामीच्या अविष्का फर्नांडो आणि कमिंदू मेंडीस यांनी 87 धावांची भागिदारी केली. फर्नांडोने 49 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. त्यानंतर कर्णधार कुशल मेंडीस सलमान आगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कमिंदू मेंडीस आणि पवन रत्नायके यांनी संघाला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 146 धावांची भागिदारी केली. कमिंदू मेंडीसने 107 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह शतक झळकविले. शाहिन आफ्रीदीच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. कमिंदू मेंडीसने 128 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 131 धावा जमविल्या. यानंतर लंकेचे फलंदाज धावांची गती वाढविण्याच्या नादात लवकर बाद झाले. शनाकाने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 तर लियानगेने 6 धावा केल्या. अराच्चिगेने 2 चौकारांसह 15 तसेच वेलालगेने 3 आणि महेश तिक्षाणाने 1 षटकारासह नाबाद 9 व असिता फर्नांडोने नाबाद 6 धावा जमविल्या. रत्नायके पाचव्या गड्याच्या रुपात 45 व्या षटकात बाद झाला. त्याने 65 चेंडूत 8 चौकारांसह 77 धावा झळकाविल्या. लंकेचे मधल्या फळीतील फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाहीत. लंकेने शेवटच्या 10 षटकात लंकेने 87 धावा जमविताना 6 गडी गमविले. लंकेच्या डावामध्ये 6 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहिन आफ्रीदी, नसीम शहा, सलमान आगा आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कमिंदू मेंडीसचे वनडे क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. सलामीचा सदाकत दुसऱ्या षटकात झेलबाद झाला. मधूशंकाने त्याला 5 धावांवर रत्ननायकेकरवी झेलबाद केले. त्यानंतर मधूशंकाने पाकला आणखी एक धक्का देताना अनुभवी बाबर आझमला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 14 अशी होती.

फखर झमान आणि साद बेग या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 23.2 षटकात 149 धावांची भागिदारी केली. 27 व्या षटकात लंकेच्या तिक्ष्णाने स्वत:च्या गोलंदाजीवर बेगला टिपले. त्याने 75 चेंडूत 11 चौकारांसह 74 धावा झळकविल्या. फखर झमानने 84 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह शतक पूर्ण केले. शतकानंतर तो अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. मधूशंकाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडाला. झमानने 99 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारांसह 127 धावा जमविल्या. वेलालगेने सलमान आगाला त्रिफळाचीत केले. त्याने 17 धावा जमविल्या. पाकने 37 षटकात 5 बाद 230 धावांपर्यंत मजल मारली होती.

हसन नवाज आणि अराफत मिनहास या जोडीने सहाव्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केल्याने पाकला पुन्हा विजयाच्या आशा निर्माण झाल्या. मिनहासने 31 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 61 धावा जमविल्या. असिता फर्नांडोने त्याला स्वत:च्या गोलंदाजीवर टिपले. असिता फर्नांडोने यानंतर याच षटकातील पुढील चेंडूवर फईम अशरफला झेलबाद केले. 47.5 षटकात पाकने 7 बाद 324 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांना विजयासाठी केवळ एका धावेची गरज होती. हसन नवाजने 45 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 37 तर कर्णधार शाहिन आफ्रीदीने 3 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 6 धावा जमवित आपल्या संघाला 9 चेंडू बाकी ठेऊन विजय मिळवून दिला. फखर झमानला तिक्ष्णाकडून जीवदान मिळाले आणि या जीवदानाचा लाभ घेत त्याने आपले शतक पूर्ण केले. लंकेतर्फे मधूशंकाने 63 धावांत 3, असिता फर्नांडोने 72 धावांत 2 तर महेश तिक्षाणा व वेलालगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 50 धावा जमविताना 2 गडी गमाविले. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात त्यानी 194 धावा जमविताना 3 गडी गमाविले. शेवटच्या 10 षटकात पाकने 2 गडी गमाविताना 87 धावांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक : लंका 50 षटकात 8 बाद 325 (कमिंदू मेंडीस 131, अविष्का फर्नांडो 38, रत्नायके 77, अवांतर 15, शाहिन आफ्रीदी, नसिम शहा, सलमान आगा आणि हॅरिस रौफ प्रत्येकी 2 बळी), पाक 48.3 षटकात 7 बाद 331 (फखर झमान 127, साद बेग 74, अराफत मिनहास 61, हसन नवाज नाबाद 37, सलमान आगा 17, शाहिन आफ्रीदी नाबाद 6, अवांतर 4, मधुशंका 3-63, असिता फर्नांडो 2-72, महेश तिक्षाणा व वेलालगे प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.