For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीप डिप्रेशन ओसरले; आता मुसळधार!

06:07 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
डीप डिप्रेशन ओसरले  आता मुसळधार
Advertisement

बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेल्या यंदाच्या पहिल्या डीप डिप्रेशनचा प्रभाव आता कमी होऊ लागला असला, तरी त्यानंतर राज्यातील पावसाचा केंद्रबिंदू कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याकडे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 ऑगस्टपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसह सह्याद्रीच्या घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

आधीपासूनच पावसाळ्याच्या दिवसात महापुराच्या संकटांनी चिंतेत असणाऱ्या या भागासमोर यंदाही नवे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून डीप डिप्रेशनच्या प्रभावामुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला होता. आता ही प्रणाली कमकुवत होत असली, तरी मान्सूनचा सक्रिय पट्टा पश्चिम किनारपट्टीकडे सरकल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता कायम राहणार आहे. त्यामुळे नद्या, ओढे आणि धबधब्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढण्याची तसेच डोंगराळ भागात दरड कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अल्प कालावधीत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनी भरतीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली जिह्यांच्या घाटमाथा परिसरात जोरदार सरींचा अंदाज असून कोयना, वारणा, राधानगरी, दूधगंगा आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला, तरी नदीकाठच्या गावांनी पूरस्थितीबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.

Advertisement

विशेषत: आंबा घाट, आंबोली, अणस्कुरा, कुंभार्ली, अम्बेनळी, भोर आणि ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, रस्त्यांवर दगड-माती येणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबई महानगर प्रदेशातही अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यांत कमी कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचणे, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच दैनंदिन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी होण्याची चिन्हे आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात डीप डिप्रेशनचा प्रभाव ओसरत असल्याने अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, बीड, लातूर आणि हिंगोली जिह्यांत तुरळक सरी आणि मेघगर्जनेची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिह्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहू शकतो. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील पावसामुळे राज्यातील बहुतांश मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. कृषी क्षेत्रासाठी ही परिस्थिती दिलासादायक मानली जात असली, तरी अतिवृष्टीच्या भागांमध्ये पिकांमध्ये पाणी साचू नये यासाठी शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हवामान तज्ञांच्या मते, डीप डिप्रेशन कमकुवत झाले असले तरी मान्सून अद्याप सक्रिय असल्याने पुढील काही दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे पूर, दरड कोसळणे आणि स्थानिक पातळीवरील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  एकंदरीत, डीप डिप्रेशनचा थेट प्रभाव कमी झाला असला तरी महाराष्ट्रातील पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. मात्र आता त्याचा मुख्य फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसराला बसण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होत जाण्याची चिन्हे आहेत.एकंदरीत, डीप डिप्रेशनचा थेट प्रभाव कमी झाला असला तरी महाराष्ट्रातील पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. मात्र आता त्याचा मुख्य फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसराला बसण्याची शक्यता असून राज्याच्या इतर भागांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होत जाण्याची चिन्हे आहेत.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.