ट्रम्प यांच्यावर पूर्वाश्रमीच्या मॉडेलचा बलात्काराचा आरोप
33 वर्षांपूर्वीच्या घटनेचा अहवालात उल्लेख : व्हिसा मिळवून देण्याचे दाखविले होते आमिष
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्वित्झर्लंडच्या माजी मॉडेल बीट्रिस क्मयूल यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. 1993 मध्ये न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचा त्यांचा दावा आहे. अमेरिकन काँग्रेसमधील डेमोक्रेटिक सदस्यांनी प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात या आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे.
क्मयूल यांनी यापूर्वी 2024 मध्ये ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी गैरवर्तनाचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. आता समितीच्या कर्मचाऱ्यांसमोर दिलेल्या माहितीत त्यांनी संबंधित घटनेत बलात्कार झाल्याचा आरोप केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सौंदर्यस्पर्धेदरम्यान ट्रम्प यांच्याशी भेट
बीट्रिस क्मयूल या स्वित्झर्लंडच्या माजी मॉडेल असून त्यांनी मिस स्वित्झर्लंड स्पर्धेतही सहभाग घेतला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1993 मध्ये त्या अमेरिकन ड्रीम पेजेंट या सौंदर्यस्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेल्या होत्या. या स्पर्धेशी ट्रम्प यांचा व्यावसायिक संबंध होता. मॅनहॅटनमधील प्लाझा हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत आयोजित भोजनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची ट्रम्प यांच्याशी भेट झाली. त्यानंतर ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना हॉटेलमधील खोलीत भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा क्मयूल यांनी केला आहे. तेथे केवळ चर्चा होईल, अशी अपेक्षा असताना ट्रम्प यांनी बळजबरी केल्याचा आरोप त्यांनी केला.
गप्प राहण्यास सांगितल्याचा दावा
घटनेनंतर ट्रम्प यांनी आपल्याला याबाबत कोणालाही सांगू नये, असे सांगितल्याचा आरोप क्मयूल यांनी केला आहे. तसेच अमेरिकेचा व्हिसा मिळवून देणे आणि न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश मिळविण्यास मदत करणे, अशी आश्वासने दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी ट्रम्प यांचे निकटवर्तीय पाओलो झाम्पोली यांची मदत घेण्याचा उल्लेख झाल्याचा दावा त्यांनी केला. अमेरिकेत आल्यानंतर आपला पासपोर्ट काढून घेण्यात आल्यामुळे स्पर्धा सोडून परत जाणे शक्मय झाले नाही, असेही क्मयूल यांनी सांगितल्याचे अहवालात नमूद आहे. स्वित्झर्लंडला परतल्यानंतर त्यांनी हवाई येथे होणाऱ्या ट्रम्प प्रायोजित अन्य स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्याचेही सांगितले जाते.
अन्य महिलांच्या आरोपांचाही अहवालात उल्लेख
ट्रम्प यांच्याविरोधातील इतर महिलांनी केलेल्या आरोपांचाही अहवालात समावेश आहे.
स्टेसी विल्यम्स : जेफ्री एपस्टीन उपस्थित असताना ट्रम्प यांनी अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केटी जॉन्सन : 1994 मध्ये आपण 13 वर्षांचे असताना ट्रम्प आणि एपस्टीन यांनी बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी एफबीआयकडे केला होता.
’जेन’ या नावाने उल्लेख केलेली महिला : आपण 14 वर्षांचे असताना एपस्टीनने ट्रम्प यांच्याशी ओळख करून दिल्याचे त्यांनी एफबीआयला सांगितल्याचा अहवालात उल्लेख आहे.
