‘टोटल चेस’ स्पर्धेत प्रज्ञानंदसह तीन भारतीयांचा सहभाग
वृत्तसंस्था, बुडापेस्ट, हंगेरी : येथे 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या पहिल्या ‘टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर पायलट’ स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आलेल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये आर. प्रज्ञानंदसह तीन भारतीयांचा समावेश आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मॅग्नस कार्लसन आणि दुसऱ्या क्रमांकावरील फॅबियानो काऊआना हे दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत.
‘नॉर्वे चेस’चे विजेतेपद आणि ‘सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ’ स्पर्धा जिंकल्यानंतर तसेच ‘ग्रँड चेस टूर’च्या अंतिम टप्प्यात धडक मारल्यानंतर उत्कृष्ट लयीत असलेल्या प्रज्ञानंदसोबत त्याची मोठी बहीण आणि ‘वुमन्स पॅंडिडेट्स’ स्पर्धेची विजेती आर. वैशाली तसेच भारताचा अव्वल रॅपिड आणि ब्लिट्झ खेळाडू अर्जुन एरिगेसी हे देखील सहभागी होणार आहेत. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या 18 खेळाडूंच्या यादीत या तिघांचा समावेश आहे. उर्वरित सहा खेळाडूंची नावे पुढील महिन्यात जाहीर केली जातील, ज्यामुळे 24 खेळाडूंची अंतिम यादी पूर्ण होईल.
या नाविन्यपूर्ण स्वरूपांतर्गत खेळाडू ब्लिट्झ, रॅपिड आणि ‘फास्ट क्लासिकल’ अशा विविध प्रकारांत स्पर्धा करतील, ज्यामुळे तिन्ही प्रकारांतील वेळेच्या नियंत्रणांनुसार त्यांच्या अष्टपैलू कौशल्याची कठीण परीक्षा घेतली जाईल. या प्रायोगिक स्वरुपातील स्पर्धेचे निकाल ‘टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर’ची स्पर्धात्मक रचना निश्चित करण्यास मदत करतील. या टूरमध्ये पुढील वर्षापासून जगभरातील विविध शहरांमधील चार प्रमुख स्पर्धांचा समावेश असेल. रॅपिड, ब्लिट्झ आणि क्लासिकल चेसला एकत्र आणणारे हे स्वरूप रोमांचक आणि आव्हानात्मक असेल, असे प्रज्ञानंदने म्हटले आहे.
‘टोटल चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर’मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग किंवा स्पर्धा नसून एकच एकत्रित खुले स्वरूप ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र श्रेणी नसल्यामुळे काही वर्गांतून यावर टीका झाली असून चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रायोगिक स्पर्धेत 24 अव्वल खेळाडू सहभागी होतील आणि स्पर्धेची सुऊवात गट फेरीने होईल, ज्यामध्ये प्रत्येकी सहा खेळाडूंचे चार गट असतील. प्रत्येक गट पाच दिवसांच्या कालावधीत ‘डबल राउंड-रॉबिन’ पद्धतीने सामने खेळेल. यात खेळाडू ‘फास्ट क्लासिकल’ प्रकारातील 10 सामने खेळतील.