जोकोव्हिच पहिल्याच फेरीत बाहेर
पराभवानंतर कोर्टवर अश्रू अनावर ; युवा टेनिसपटू नाव्होनेकडून पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला अर्जेंटिनाच्या मारियानो नाव्होनेने पाच सेटच्या सामन्यात पराभूत केले. पराभवानंतर जोकोविचला कोर्टवरच अश्रू अनावर झाले. जोकोविचला नाव्होनेविरुद्ध 6-7, 7-5, 6-4, 2-6, 1-6 असा पराभव स्वीकारावा लागला. जवळपास चार तास रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचने एकवेळ सामना आपल्या बाजूने फिरवला होता, पण निर्णायक सेटमध्ये त्याची तब्येत बिघडली आणि अखेर त्याला सामना वाचवता आला नाही आणि पहिल्याच फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूयॉर्कमधील दमट आणि उष्ण वातावरणाचा जोकोविचला मोठा त्रास झाला. सामन्यादरम्यान वारंवार तो डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवत असल्याचे दिसून येत होते. एसी सुरू करता येईल का, अशी विचारणाही त्याने सुपरवायझरकडे केली. मात्र, या सगळ्या अडचणी असूनही जोकोविचने हार मानली नाही.
कोर्टवरच उलट्या, अश्रू अनावर
सामन्याचा तिसरा सेट सुरू असताना जोकोविचची प्रकृती आणखी बिघडली. सहाव्या गेमदरम्यान त्याने कोर्टवरच उलट्या केल्या. तो कोर्टच्या मागील बाजूला वाकून उभा राहिला होता. या परिस्थितीतही त्याने सामना सोडला नाही. उलट पहिला सेट गमावल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. पहिला सेट जोकोविचने टायब्रेकरमध्ये गमावला. त्याच्या खेळात अनेक चुका होत होत्या. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये त्याने 7-5 असा विजय मिळवत सामन्यात पुनरागमन केले. त्यानंतर तिसरा सेटही 6-4 असा जिंकला. एकीकडे शरीर साथ देत नव्हतं, तर दुसरीकडे अनुभवाच्या जोरावर जोकोविचने सामना 2-1 असा आपल्या बाजूने आणला. पण चौथ्या सेटमध्ये अर्जेंटिनाच्या नवोनेने आक्रमक खेळ करत हा सेट 6-2 असा जिंकला. त्यामुळे सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये पोहोचला. पाचव्या सेटमध्ये मात्र जोकोविचकडे नवोनेच्या वेगवान खेळाला उत्तर देण्यासाठी आवश्यक ऊर्जा उरली नव्हती. नाव्होनेने सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला आणि 4-1 अशी आघाडी घेतली आणि हा सेट 6-1 असा जिंकला आणि जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.
दरम्यान, पराभव स्पष्ट झाल्यानंतर जोकोविच भावूक झाला. काही वेळाने त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कोर्टवरच तो रडताना दिसला. जोकोने शेवटपर्यंत चिवटपणे झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. पराभवासह त्याला 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यापासून वंचित रहावे लागले.