चेन्नईत एकाच कुटुंबातील 4 जणांचे आढळले मृतदेह
पती-पत्नी अन् दोन मुलांच्या मृत्यूमुळे खळबळ
चेन्नई : तामिळनाडूच्या चेन्नई येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चेन्नईत एकाच कुटुंबाचे 4 सदस्य मृत आढळून आले असून यात दोन किशोरवयीन मुलांचा देखील समावेश आहे. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश असून यातील एक जण डॉक्टर तर दुसरा वकील होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दांपत्यासह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले आहेत. डॉक्टरचा चालक गुरुवारी सकाळी तेथे पोहोचला. घराचे दार बराचवेळ कुणीच न उघडल्याने त्याने पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर डॉक्टर बालामुरुगन (52 वर्षे), त्यांच्या पत्नी सुमति (47 वर्षे) अन्नानगर येथील निवास्थानाच्या एका खोलीत तर त्यांचे मुलगे दुसऱ्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. शहरात अनेक अल्ट्रासाउंड सेंटर्स चालविणारे डॉ. बालामुरुगन कथित स्वरुपात कर्जात बुडाले होते असे बोलले जात आहे. परिवाराने आत्महत्या केल्याचा संशय आहे. आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.