गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी झहीर, बालाजी यांचा विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गौतम गंभीर यांची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आता माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व लक्ष्मीपती बालाजी यांचा गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘गोलंदाज प्रशिक्षक या पदासाठी बीसीसीआय झहीर खान व एल. बालाजी यांच्याबद्दल चर्चा करीत आहे. विनय कुमार यांच्याबाबत मात्र बीसीसीआयने फारसा रस दाखवलेला नाही,’ असे या सूत्राने सांगितले. झहीरने 92 कसोटीत 311 तर एकूण 309 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकूण 610 बळी मिळविले आहेत. भारताचा तो एक सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज मानला जातो. बालाजीने 8 कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याने 37.18 च्या सरासरीने 27 बळी टिपले आहेत. नव्या प्रशिक्षकपदाबरोबर नवा साहायक स्टाफही निवडला जातो. गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांचा कार्यकालही संपला आहे.