गृहज्योती : वीज ग्राहकांच्या पडताळणीला महिनाभराची मुदतवाढ
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :
गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. मात्र, याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे, सरकारने गृहज्योती लाभार्थ्यांच्या पडताळणीची अंतिम मुदत आणखी एका महिन्याने वाढविली आहे. बेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात 1 जुलैपासून सुरू झालेले हे सर्वेक्षण काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, लाभार्थ्यांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने सरकारने हा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविला आहे. राज्यातील सर्व वीज पुरवठा निगम (एस्कॉम)मध्ये गृहज्योती योजनेंतर्गत विद्युत ग्राहकांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरू आहे. बेस्कॉम आणि इतर एस्कॉमच्या कार्यक्षेत्रात कर्मचारी दररोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. आतापर्यंत सर्वेक्षणाचे 70 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित 30 टक्के काम अद्याप बाकी आहे.
गृहज्योती लाभार्थ्यांकडून प्रतिसाद नाही
गृहज्योती योजनेच्या लाभार्थ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे माहिती अपडेट करण्यात अडचणी येत आहेत. कर्मचारी ग्राहकांच्या घरी गेल्यानंतर अनेक ठिकाणी घरमालक आढळलेले नाहीत. त्यामुळे, कर्मचारी ‘डोअर लॉक’ पर्यायाचा वापर करून संदेश पाठवत आहेत. अकाउंट आयडी नमूद केल्यास एस्कॉम कर्मचाऱ्याच्या संपर्क क्रमांकासह संदेश पोहोचेल. यामुळे ग्राहक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देऊ शकतील.
सर्वेक्षणाच्या कामात काही अपार्टमेंटमधील रहिवाशांकडून सहकार्य मिळत नाही. अनेक अपार्टमेंटमध्ये रहिवासी अचूक माहिती देत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग मंदावत आहे. या संदर्भात, बेस्कॉमने राज्य सरकारकडे आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. याला सरकारने संमती देत मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
ऑक्टोबरमध्ये सर्व वीजपुरवठा निगम राज्य सरकारकडे नोंदणीची माहिती सादर करतील. या माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
गृहज्योती योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे, पडताळणीसंबंधीच्या सर्वेक्षणात अचूक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहक घरी नसला तरी, त्याने कर्मचाऱ्यांनी पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद देऊन आवश्यक माहिती द्यावी. अचूक माहिती न मिळाल्यास, सर्वेक्षण अपूर्ण राहील आणि पात्र लोकांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.