For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोदकामावेळी सापडली 95 कोटीची सोन्याची नाणी

06:33 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
खोदकामावेळी सापडली 95 कोटीची सोन्याची नाणी
Advertisement

बेल्जियममध्ये एका इमारतीच्या पाया खोदाईदरम्यान मोठ्या संख्येत सोन्याची नाणी हाती लागली आहेत. या खजिन्याची किंमत जवळपास 9 दशलक्ष युरो म्हणजेच 95 कोटी रुपये इतकी आहे. 33 वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत साइट मॅनेजरने स्वत:च्या आयुष्यात असे दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नव्हते असे उद्गार काढले आहेत.

Advertisement

बेल्जियमच्या फ्लेमिश भागातील सिंट-गिलिस-डेंडरमोंडे येथे ही घटना घडली असून ते राजधानी ब्रसेल्पासून सुमारे 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे एका इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरु होते. कामगार सीवर पाइप टाकण्यासाठी इमारतीच्या पायाच्या आसपास खोदकाम करत असताना जमिनीत त्यांना कोट्यावधीचा खजिना मिळाला आहे.

खोदकामादरम्यान कामगारांना जमिनीत काही गोष्टी दिसून आल्या. जुन्या नाण्यांचा हा ढिग असावा असे त्यांना प्रारंभी वाटले, परंतु बारकाईने पाहिल्यावर त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. खोदकामादरम्यान सोने मिळेल अशी अपेक्षाच नव्हती असे एका कामगाराने म्हटले आहे.

Advertisement

त्याच ठिकाणी सोन्याच्या विटाही मिळाल्या आहेत. माती हटवत गेल्यावर आणखी सोन्याच्या नाणी अन् विटा मिळत गेल्या. कामगारांना मिळालेल्या सोन्याच्या नाणी अन् विटांची एकूण किंमत जवळपास 9 दशलक्ष युरो असल्याचे सांगण्यात आले. भारतीय चलनात याचे मूल्य जवळपास 95 कोटी रुपये इतके होते. परंतु इतका मोठा खजिना मिळून देखील कामगार तो स्वत:च्या घरी घेऊन जाऊ शकले नाहीत. बेल्जियमच्या नियमांनुसार जमिनीत मिळालेला असा खजिना थेट कामगारांचा होत नाही, याचमुळे पूर्ण खेप पोलिसांना सोपविण्यात आली आहे.

आता खजिना कुणाचा?

जमिनीत गाडलेला हा खजिना अखेर कुणाचा होता हे सध्या स्पष्ट नाही. तर खजिन्याला सध्या एका संस्थेकडे ठेवण्यात आले आहे. ही संस्था डेंडरमोंडेच्या लोकांना सामाजिक आणि कल्याणसंबंधी मदत पुरविते. या संपत्तीचा वापर त्याच्या धर्मादाय कामांमध्ये केला जाऊ शकतो. इतिहासकार आणि डेंडरमोंडेचे माजी महापौर पिएट बायसे यांनी हा खजिना एखाद्या स्थानिक मद्य उत्पादक परिवाराचा असू शकतो असा अनुमान व्यक्त केला आहे. बेल्जियमच्या कायद्यानुसार खऱ्या मालकाकडे या खजिन्यावर दावा करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी आहे. जर यादरम्यान कुणीच मालक म्हणून समोर न आल्यास आणि खजिना कुठल्याही गुन्ह्याशी संबंधित न आढळून आल्यास नियमांनुसार तो शोधणारा व्यक्ती आणि जमिनीच्या मालकादरम्यान वाटला जाऊ शकतो.

गोल्ड डिगर्सची धाव

कोट्यावधीचे सोने मिळाल्याचे खबर फैलावतच आसपासच्या लोकांमध्येही यावरुन उत्सुकता वाढली. अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि खोदकामाच्या ठिकाणी खजिना शोधण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे डेंडरमोंडे पोलिसांना इशारा जारी करावा लागला. आता तेथे पाहण्यासाठी किंवा शोधण्यासाठी काहीच शिल्लक नाही. तसेच संबंधित इमारत पूर्णपणे पाडविली जात असल्याने तेथे जाणे धोकादायक ठरू शकते असे पोलिसांनी सांगितले आहे.

खजिन्याच्या शोधासाठी आम्हाला काही इनाम मिळू शकते, आम्हाला ‘फाइंडर्स फीस’ मिळण्याची अपेक्षा आहे, जर असे घडले तर ते आमच्यासाठी अत्यंत चांगले ठरेल असे 18 वर्षीय कामगार कोबोने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.