खेळणी निवडताना
मुलांसाठी खेळणी घ्यायची तर बाजारात आज इतके पर्याय आहेत की ते पाहून आपलं डोकं चक्रावून जातं. त्यापैकी कोणत्या खेळण्यांची निवड करायची असा प्रश्न आपल्याला पडतो. खेळण्यांची खरेदी करायची असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेतल्या पाहिजेत.
लांसाठी खेळणी घेण्यासाठी बाजारात गेलात तर आपण चक्रावून जाऊ इतके पर्याय आपल्यासमोर असतात. सगळीच खेळणी आपल्या घरात हवीत, असं आपल्याला एकदा तरी वाटतं. शिवाय तुमच्याबरोबर शॉपिंगसाठी तुमचं मूल असेल तर त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आपण अनावश्यक खेळण्यांची खरेदी करतो. आपल्या मनातील ही द्विधा अवस्था दूर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
सर्वात आधी हे लक्षात घ्या की जे खेळणं खरेदी करायचं आहे ते मुलांच्या वयोमानानुसार असेल. मूल आणखी एक वर्षांचं झालं की त्याच्याशी खेळेल, असा विचार करुन खेळण्याची खरेदी करु नका. अनेकदा उत्साहाच्या भरात अशी खेळणी खरेदी केली जातात. पण नंतर त्याचा उपयोग होतोच असं नाही.
खेळणं अशा मटेरिअलपासून बनलेलं असावं ज्यापासून मुलांना कोणतंही नुकसान होणार नाही. मग ते सॉफ्ट टॉईज असो किंवा आणखी कोणतंही. त्याचे कोपरे टोकदार असू नयेत. शिवाय मुलं अनेकदा खेळणी तोंडातही घालतात. त्यामुळे त्यावर मुलांना धोकादायक ठरेल, अशा रसायनांचं कोटींग नसावं. खेळणं घेण्यासाठी घराबाहेर पडण्याआधी आपलं बजेट किती आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं खेळणं हवं आहे, हे ठरवावं.
एखाद्या खेळण्यासाठी मुलांनी हट्ट धरला आणि ते आपल्या बजेटमध्ये असेल तर ते घ्यायला हरकत नाही. पण, तशी परिस्थिती नसेल तर त्यांना दुसरी एखादी गोष्ट घेऊन देऊन त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करावा.
कोणतंही खेळणं खरेदी करताना ते मल्टीपर्पज असेल तर खूपच चांगलं. एखाद्या खेळण्यामुळे मुलांची क्रिएटीव्हीटी जागृत होईल, याकडेही लक्ष द्या. ज्या खेळण्यांनी मुलांना आपल्या बहिण-भावाशी, मित्रांशी, आई-वडिलांशी खेळता येईल अशा खेळण्यांची निवड करा.
मुलांच्या विकासात रंगांचंही मोठं योगदान असतं. त्यामुळे खेळणी ख़रेदी करताना ती रंगीबेरंगी असतील, याकडे लक्ष द्यावं. ब्लॉक्स, क्ले, पझल्स अशी खेळणी मुलांच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरतात. मुलांची निर्णयक्षमता विकसित करण्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मुलांना ती जरुर द्यावीत.
आजकाल बाजारात किचन सेट, जंगल सेट, डॉल सेटही मिळतात. आपल्या घरामध्ये जागा कमी असेल तर फार मोठी खेळणी आणू नका. बॅटरी, विजेवर चालणारी किंवा अन्य ऍटोमेटिक खेळणी मुलांचं तंत्रज्ञानाविषयी ज्ञान वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. पण, ती देण्यापूर्वी मुलांना नीट समजवावं किंवा अशी खेळणी ते खेळत असतील तेव्हा त्यांच्यापाशी एखादी मोठी व्यक्ती असेल यासाठी प्रयत्न करा. आजकाल बाजारात अनेक प्रकारची म्युझिकल खेळणीही मिळतात. त्याचप्रमाणे स्पेलिंग, शब्द इत्यादी शिकवणारी खेळणीही उपलब्ध आहेत. अशी खेळणी मुलांचं मनोरंजन करतानाच त्यांना अनेक गोष्टी शिकवतात.