खजाना राशिभविष्य
बुधवार, दि. 3 ते मंगळवार, दि. 9 जून 2026 पर्यंत
मेष
स्वत:वर व स्वत:च्या रागावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपल्या कामावर आपले वरिष्ठ खूश होतील. आपले काम चोख होईल. पैतृक संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. लहान भावंडाचा सहवास मिळेल. त्यांच्याबरोबर छोट्यामोठ्या प्रवासाचा आनंद मिळवाल. एकूण हा आठवडा आपला छान जाईल.
उपाय : मंगळवारी बजरंगबाण वाचा.
वृषभ
या आठवड्यात आपला आत्मविश्वास वाढेल. इतके दिवस आपली अर्धवट राहिलेली कामे व्यवस्थित पार पडतील. या आठवड्यात घरी काहीतरी सुखोपभोगाच्या वस्तूंची खरेदी होण्याचा संभव आहे. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण तो धनलाभ योग्य व सन्मार्गाने आला तरच स्वीकारा.
उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.
मिथुन
सरकारी कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. सभा-समारंभात सहभागी होणार असाल, तर डोक थंड ठेवून जा व काम करा. शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची असते हे लक्षात ठेवा. कष्ट भरपूर करावे लागणार असे दिसते. कुटुंबाकडून सहकार्य व सुख संभवते. या आठवड्यात तुमच्या बोलण्यात, तुमच्या वाणीमध्ये फरक झाल्याचे तुम्हाला जाणवेल.
उपाय : शुक्रवारी दत्ताचे दर्शन घ्या व आराधना करा.
कर्क
विवाहेच्छुंचे विवाह जमतील. जोडीदार चांगला मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कामानिमित्त परदेश प्रवास घडण्याची किंवा तशी प्रक्रिया चालू होईल. कोणत्यातरी सरकारी कामातून लाभ मिळण्याची शक्यता आहे किंवा सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. प्रलोभनापासून दूर रहा.
उपाय : सद्गुरुंचे नामस्मरण करा.
सिंह
या आठवड्यात आपले अध्यात्मिक मार्गाकडे जास्त लक्ष जाण्याची शक्यता आहे किंवा त्या क्षेत्रातील आपला अभ्यास वाढेल. मुलांची प्रगती चांगली होईल. त्यांच्या बाबतीतल्या काळजी हळूहळू कमी होतील. एखादी तीर्थयात्रा घडेल. आईची प्रकृती चांगली राहील. मात्र कष्टाशिवाय फळ नाही.
उपाय : गणपती अथर्वशीर्ष पारायण करा.
कन्या
या आठवड्यात काही काम करू नये. स्वस्थ बसून रहावे, असे वाटण्याची शक्यता आहे. आळसावल्यासारखे होईल किंवा काही करू जावे, तर लवकर ठरविलेल्या वेळात काही होत नाही, असेही जाणवेल. वडील भावंडांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यातून थोडाफार आनंद मिळेल.
उपाय : संकटनाशन गणेश स्तोत्र मंगळवारी म्हणा.
तुळ
नोकरीच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. कदाचित कामानिमित्त परदेशवारीही होऊ शकेल. मुलांच्या प्रगतीची वार्ता येईल. पण स्वत:च्या प्रकृतीकडेदेखील लक्ष द्यावे लागेल. किरकोळ तक्रारी असतील. जोडीदाराशी पंगा घ्यायला जाऊ नका. त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागा. एकंदरीत हा आठवडा छान जाईल.
उपाय : ‘ॐ नम: शिवाय’चा जप करा.
वृश्चिक
हा आठवडा आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सहवासात छान जाईल, असे दिसते. आपण आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट कराल आणि त्याचे समाधानही आपल्याला मिळेल. तुमच्या जोडीदाराचा सहवास व सहकार्य चांगले मिळेल. मुलांच्याकडे मात्र थोडे लक्ष द्यावे लागेल. सुट्टीतील आळस झटकायला हवा.
उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा वाचा.
धनु
सगळे आयते आपल्या हातात मिळेल, अशी अपेक्षा करू नका. स्वत: उठून, पुढे जाऊन, कष्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नसते. आईचा सहवास छान मिळेल. पण तिची सेवा करा. आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल, तर थोडे प्रयत्न घेतलात तर व्यवसायवृद्धी नक्की होईल. प्रयत्न मात्र हवेत.
उपाय : सद्गुरुंची आराधना करा.
मकर
आपल्या हातून काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या तरी धार्मिक समारंभात सहभागी व्हाल. त्यासाठी कदाचित दूरच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. आपल्याकडून होणाऱ्या कामावर, प्रेझेंटेशनवर सगळे खूश होतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.
उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळावर गंध लावा.
कुंभ
अति हाव करू नका. स्वत:वर कुठेतरी मर्यादा घातलीच पाहिजे. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे फळ मिळेल. पण संयम असू द्या. संततीच्या बाबतीत आनंदवार्ता कानी येईल. परदेशातून धनलाभ संभवतो. कदाचित परदेशी मालाच्या आयात-निर्यातीत अथवा परदेशातील नोकरीतून धनलाभाची शक्यता आहे.
उपाय : शनिमंदिरात जाऊन शनिला मोहरीचे तेल वाहा.
मीन
वाणीवर जरा नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्याने कुणाला काही त्रास होणार नाही ना याची काळजी घ्या. तुम्ही केलेल्या कामाची सरकार दरबारी नक्की दखल घेतली जाईल. आपल्या कामाचे कौतुक होईल. जागा व घर खरेदीचे विचार डोक्यात येऊ लागतील किंवा चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
उपाय : शुक्रवारी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा करा.