कसोटी संपली तर क्रिकेट संपेल : दिलीप वेंगसरकर
► पुणे / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट किती टिकेल माहित नाही. पण, कसोटी क्रिकेट संपले, तर खरे क्रिकेटच संपून जाईल, अशी भीती भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सोमवारी व्यक्त केली. पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संघाचे संस्थापक कै. ज. स. करंदीकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते.
वेंगसरकर म्हणाले, टेस्ट क्रिकेट हे सगळ्याच अर्थाने टफ क्रिकेट आहे. टेस्ट क्रिकेचा फॉरमॅट वेगळा आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक सेशन महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांमध्ये टेस्ट बघायला भरपूर प्रेक्षक येतात. तिथे खऱ्या अर्थाने खेळाडूंचा कस लागतो. टेस्ट क्रिकेट हे अल्टिमेट क्रिकेट आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट किती टिकेल, हे सांगता येणार नाही. पण, कसोटी क्रिकेट संपले तर क्रिकेट संपेल, एवढे मात्र नक्की.
इंग्लंडच्या दौऱ्यावर सध्या भारतीय संघ गेला आहे. पहिल्या दोन टेस्ट मॅच या सिरीजचा रिझल्ट ठरवतील. इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होत असतात. आपला संघ तिथल्या वातारणाशी जेवढे लवकर जुळवून घेईल, तेवढे चांगले आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल यांच्याकडे या मालिकेच्या निमित्ताने चांगली संधी आहे. सगळेच म्हणतात या संघाकडे अनुभव नाही. पण, खेळल्याशिवाय अनुभव येणारच नाही. भारताची टीम स्ट्राँग आहे. त्यामुळे आपला संघ तिथे चांगली कामगिरी करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
...अन् धोनी कर्णधार झाला
टी-20 विश्वचषकाच्यावेळी राहुल द्रविडला पॅप्टन्सी करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण, त्याने नकार दिला. तेव्हा आता नवीन कर्णधार कोणाला करायचे, हा प्रश्न होता. त्यावेळी युवराज सिंगचे नाव पुढे आले होते. पण, द्रविडने धोनीचे नाव सुचविले. सगळेच धोनीला पॅप्टन करा, असे म्हणायला लागले. धोनीचा अॅटीट्यूड, त्याचा क्रेकेटचा सेन्सही जबरदस्त होता. त्यामुळे कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात पडली, असा किस्साही त्यांनी सांगितला.
1983 च्या विश्वचषकात भारतीय संघ फेव्हरेट नव्हता
1983 सालचा विश्वचषक सुरू झाला तेव्हा भारतीय संघ हा फेव्हरेट नव्हता. वेस्ट इंडिज किंवा इंग्लंड विश्वचषक जिंकतील, असे सगळ्यांना वाटायचे. आपण यात कुठेच नव्हतो. पण, नंतर झिंम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांना हरवून आपण फायनलमध्ये पोहोचलो. त्यानंतर अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला हरवून आपण विश्वचषक उंचावला, असेही वेंगसरकर यांनी यावेळी सांगितले.
1992 नंतर क्रिकेटमध्ये पैसा
सुऊवातीच्या काळात क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. चार महिन्यांचा दौरा होता. त्यात आम्ही सात टेस्ट खेळलो. त्याचे आम्हाला पाच हजार ऊपये मिळाले होते. त्यावेळी पैशाचा विचार करून खेळले जायचे नाही. 1992 नंतर क्रिकेटमध्ये हळूहळू पैसा यायला लागला. त्याचप्रमाणे अनेक खेळाडूही क्रिकेटमध्ये यायला लागले. तसेच नंतर आयपीएलनेही पैसा आणला. आयपीएलला एवढी वर्षे झाली. तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. अजूनही प्रेक्षक आयपीएल बघत असतात, असेही वेंगसरकर यांनी यावेळी सांगितले.
श्रेयस अय्यर संघात हवा होता
श्रेयस अय्यर आणि माझी भेट झाली. तेव्हा त्याला सांगितले, की दुखापतग्रस्त होऊ नको. फिटनेस चांगला ठेव. श्रेयस अय्यरची निवड इंग्लंडच्या दौऱ्यात व्हायला हवी होती. गिल हा गेली पाच ते सहा वर्षे इंटरनॅनशनल क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्या हातात भारताचे टेस्ट क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आहे, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.
दुलीप, इराणी ट्रॉफीवर भर
पैशाने क्रिकेटची भूक मंदावली आहे. खेळासाठी कोणी काही करत नाही. आपण दुलीप, इराणी ट्रॉफीवर भर दिला तर चांगले क्रिकेटर आपल्याला मिळतील. आपल्याकडे 14, 16 आणि 19 वर्षांखालील चांगले क्रिकेट आहे. मुळात या मातीत टॅलेंट आहे. पण, व्यासपीठ मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.