कमला हॅरिस यांच्याकरता तामिळनाडूच्या गावात पूजा
रस्त्यांवर झळकले पोस्टर्स : अमेरिकेतील अध्यक्षीय उमेदवार
वृत्तसंस्था/ चेन्नई
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून जो बिडेन यांनी माघार घेतल्यावर डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उमेदवार होणार असल्याचे मानले जात आहे. याचदरम्यान कमला हॅरिस यांच्या आजोळी म्हणजेच तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरम गाव त्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स झळकली आहेत.
कमला हॅरिस यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन याच गावाचे रहिवासी होते. गावाच्या प्रवेद्वारावर एका मंदिराबाहेर कमला हॅरिस यांचे छायाचित्र असलेला बॅनर झळकला आहे. हॅरिस यांच्याकरता आता गावातील मंदिरात पूजा सुरू करण्यात आली असून ती अमेरिकेतील मतदानाच्या दिनापर्यंत जारी राहणार आहे.
आम्ही यापूर्वीही कमला यांच्यासाठी पूजा केली होती आणि त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्या होत्या. आमच्या देवाच्या आशीर्वादाने आता त्या अमेरिकेच्या अध्यक्ष होतील असे मंदिराचे मुख्य पुजारी एम. नटराजन यांनी सांगितले आहे.
मंदिराच्या देणगीदारांमध्ये नाव
मंदिराच्या एका भिंतीवर देणगीदारांची नावे असून यात कमला हॅरिस यांचाही समावेश आहे. परंतु त्या कधीच या गावी आलेल्या नाहीत. कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्ष झाल्यावर आम्ही जल्लोष केला होता. आता त्या अध्यक्ष झाल्यास अधिक मोठा जल्लोष केला जाणार आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून त्या निश्चित आमच्या गावी येतील अशी आशा असल्याचे नटराजन यांनी म्हटले आहे.
कमला हॅरिस यांचे आजोबा दशकांपूर्वी या गावात राहत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय ग्रामस्थांच्या संपर्कात होते. तसेच मंदिर आणि गावाच्या विकासासाठी ते देगणी देत होते असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस या 59 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात झाला होता. कमला हॅरिस यांनी अनेकदा भारताला भेट दिली आहे. कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या तामिळनाडूतून अमेरिकेत दाखल झाल्या होत्या. कमला यांचे वडिल जमैका-अमेरिकन वंशाचे आहेत. श्यामला आणि डोनाल्ड यांचा 1970 मध्ये घटस्फोट झाला होता. तर कमला यांनी 2014 मध्ये डौग एम्होफ यांच्याशी विवाह केला होता.