ओमर अब्दुल्ला विरोधात मोठे बंड
नाराज 24 आमदार एकत्र, मुख्यमंत्र्यांनी सल्लागार हटविण्याची मागणी, एका आमदाराच्या घरात बैठक
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याविरोधात 24 आमदारांनी बंड केल्याचे वृत्त आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. अशा 18 नाराज आमदारांनी आमदार कैसर जमशेद लोन यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत आणखी 6 आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समाविष्ट झाले. यामुळे अब्दुल्ला अडचणीत आले असल्याचे दिसून येत आहे. नाराज आमदारांनी बंडखोरीच्या वृत्ताचा इन्कार केला असला, तरी राज्यसरकारला या घडामोडीची गंभीर नोंद घ्यावी लागली आहे.
वृत्तसंस्था, श्रीनगर
ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे राजकीय सल्लागार नासिर सोगामी हे असून त्यांच्या विरोधात आमदारांची सर्वाधिक नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या सल्लगाराला त्वरित काढून टाकावे, अशी मागणी नाराज आमदारांनी केली आहे. तसेच 27 ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार रद्द करावा, अशीही त्यांची मागणी आहे. सोगामी यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचा सल्ला दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. अनेक ज्येष्ठ आमदारांना डावलण्यात आले, असा या आमदारांचा आरोप आहे.
दोन आमदारांचा पुढाकार
ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात आघाडी उघडण्यात दोन आमदारांचा पुढाकार आहे. त्यांची नावे नझीर अहमद गुरेजी आणि मुझफ्फर इक्लाब खान यांची नावे आहेत. या दोघांनी आणमी 22 आमदारांना एकत्र केले आहे. या आमदारांनी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर आपले गाऱ्हाणे घालण्याची योजना सज्ज केली आहे. ही भेट रविवारी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही निवेदन दिले जाणार आहे. या निवेदनाला ते कसा प्रतिसाद देतात, यावर पुढचे धोरण निर्धारीत केले जाईल, असे या आमदारांचे म्हणणे आहे. आपल्या निवेदनावर विचार होईल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षत्याग करणार नाही
हा पक्षांतर्गत मतभेदांचा प्रश्न आहे. आम्ही नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष सोडणार नाही. तथापि, पक्षात राहूनच आमच्या मागण्या मान्य करुन घेण्याचा आमचा विचार आहे. आम्ही पक्ष सोडणार नसल्याची शपथही घेतली आहे. पण पक्षात असे काही लोक शिरले आहेत, की जे पक्षाला आतून दुर्बळ करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे. तरच पक्षाचे कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता आहे, अशीही प्रतिक्रिया काही आमदारांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
मंत्रिमंडळ विस्तार केवळ निमित्त
ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात काही महिन्यांपासून असंतोष निर्माण झाला आहे. ते सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत नाहीत, अशी तक्रार आहे. 27 ऑक्टोबरला अब्दुल्ला यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. अली मोहम्मद सगर, मीर सैफुल्लाहृ शमीमा फिरदौस आणि अल्ताफ अहमद कल्लू यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला. त्यामुळे असंतोषाचा भडका उडाला. अपक्ष हिंदू आमदार सतीश शर्मा यांनाही मंत्रिमंडळातून हटविण्यात आले. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ आमदारांना डावलण्यात आले. आधी त्यांचा समावेश होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. हे नाराज आमदार कोणत्या थरापर्यंत जातात, यावर बरेच काही अवलंबून असेल, असे काही राजकीय तज्ञांचे मत आहे. हे आमदार पक्ष सोडणार नाहीत. पण आपल्या संख्येत भर टाकण्याचा प्रयत्न करत राहतील. पुरेशी संख्या हाती आल्यानंतरच ते पुढचे पाऊल उचलतील. जम्मू-काश्मीरचा राजकीय इतिहास अशाच प्रकारच्या अस्थिरतेचा आहे, अशीही मांडणी काही तज्ञांनी केली.
मंत्रिमंडळ विस्तारामुळे भडका
आमदारांच्या नाराजीचा भडका मंत्रिमंडळ विस्तारामुळे झाल्याचे स्पष्ट
24 आमदारांनी वेगळी बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सल्लगार काढून टाकावा अशी मागणी
अनेक ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्याने नाराजी
