‘एमपॉक्स’ विषाणूसंबंधी केंद्राचा इशारा
दिल्लीत सापडला संशयित, राज्यांना देण्याचा आले दिशानिर्देश आणि सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आफ्रिका खंडात कहर माजविलेल्या ‘एमपॉक्स’ या विषाणूसंबंधी केंद्र सरकारने राज्यांना महत्वाचे दिशानिर्देश दिले असून सतर्कतेचा इशाराही दिला आहे. भारतात दिल्लीत या विषाणूचा संसर्ग झालेला प्रथम संशयित आढळून आल्याने सर्वत्र दक्षता बाळगण्याची सूचना करण्यात आली आहे. देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षता बाळगण्यात येणार असून प्रत्येक विदेशी प्रवाशाची कसून चाचणी केली जाईल.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी हे निशानिर्देश प्रसारित केले आहेत. त्यानुसार प्रत्येक संभाव्य आणि संशयित व्यक्तीची त्वरित तपासणी करुन दिला विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीस या विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले तर ती व्यक्ती कोणत्या अन्य व्यक्तींच्या संपर्कात आली होती, त्यांचाही शोध घेऊन त्यांची तपासणी करा, अशी सूचना राज्य सरकारांच्या आरोग्य विभागांना देण्यात आली आहे.
घाबरण्याचे कारण नाही
आतापर्यंत भारतात या विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, दिल्लीत विदेशातून आलेल्या एका भारतीयामध्ये या विषाणूची काही लक्षणे दिसून आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच्या तपासणीतून त्याला लागण झाली आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत भारतात एकही निश्चित रुग्ण सापडलेला नाही. तरीही राज्यांनी पुरेशी दक्षता घ्यावी आणि पूर्वतयारी करुन ठेवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कसा होतो प्रसार
ड या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने लैंगिक संबंधांमधून होतो. तसाच तो लागण झालेल्या माणसाच्या वस्तू, अंथरुण-पांघरुण किंवा टॉवेल इत्यादी वस्तू वापरल्यानेही होतो. लाळेच्या संपर्कातूनही तो होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ड सर्वसाधारणपणे याची लागण 18 ते 44 या वयोगटातील पुरुषांना होते, असे दिसून आले आहे. कारण आतापर्यंत सापडलेले रुग्ण याच वयोगटातील आहेत. महिलांना याची लागण होते की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी दक्षता हवी.
लक्षणे आणि दक्षता
ड लागण झाल्यापासून दोन ते दहा दिवसांनी ताप येतो. नंतर अंगावर, विशेषत: हातांचे तळवे, पाय इत्यादींवर पुटकुळ्या येतात. नंतर त्यांच्यात पू होऊन त्या फुटू शकतात. एचआयव्हीची लागण असलेल्या रुग्णांमध्ये तो अधिक प्रमाणात आहे.
ड लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीशी शारिरीक संपर्क टाळावा लागतो. तसेच अशा व्यक्तींचे कपडे आणि इतर वस्तूंचा उपयोग इतर कोणीही करु नये. संसर्ग झालेल्या व्यक्तींना इतरांपासून वेगळे ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
जीवघेणा संसर्ग
ड या विषाणूवर आजवर निश्चित उपाय न सापडल्याने पूर्वदक्षता घेणे हाच मार्ग आहे. याचा संसर्ग दुर्लक्षित राहिल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात 223 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत जगात या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 1 लाख 2 हजार 997 इतकी आहे.