एकोणीसाव्या दिवशी युद्धभूमीवर...
इराणमध्ये...
अराघची यांची अमेरिकेवर टीका
इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अराघची यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. अमेरिकाच अली लारीजानी यांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. अमेरिकेने अन्य आखाती देशांमध्ये आपले सैनिकी तळ स्थापन केले आहेत. या तळांमुळे युद्ध लांबत चालले असून ते लवकर थांबणार नाही, असा इशारा त्यांनी बुधवारी दिला.
ड इराणमध्ये गुप्तचराला मृत्यूदंड
इस्रायलच्या ‘मोस्साद’ या गुप्तहेर संघटनेला महत्वाची माहिती पुरविल्याच्या आरोपावरुन इराणमध्ये एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा बुधवारी देण्यात आली. ही माहिती ‘तस्नीम न्यू एजन्सी’ नामक अर्धसरकारी वृत्तसंस्थेने दिली. इराणमध्ये पसरलेले इस्रायलचे गुप्तचर जाळे उध्वस्त करण्याचा इराण प्रयत्न करीत आहेत.
ड होर्मुझ सामुद्रधुनीत वाढली वर्दळ
बुधवारी इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून वाढीव प्रमाणात नौकांना प्रवास करण्यास अनुमती दिली आहे. या सामुद्रधुनीवर सध्या इराणचे पूर्ण नियंत्रण आहे. तथापि, जगाची आवश्यकता लक्षात घेऊन आम्ही येथून अधिक प्रमाणात मालवाहतूक नौकांना अनुमती देत आहोत, असे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आखाती देशांमध्ये...
ड सौदी अरेबियात तातडीची बैठक
इराणकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या प्रशासनाने तातडीच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन बुधवारी केले. ही बैठक अरब आणि मुस्लीम देशांच्या नेत्यांची होती. अनेक मुस्लीम देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्रा या बैठकीला उपस्थित असून सध्याच्या परिस्थितीत ही बैठक महत्वाची ठरत आहे.
ड आखाती देशांमध्ये युव्रेनचे तज्ञ
इराणकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अरब देशांनी युक्रेनचे साहाय्य घेण्याची योजना सज्ज केली आहे. या योजनेनुसार अनेक आखाती देशांनी युक्रेनच्या 200 हून अधिक ड्रोन तज्ञांना आमंत्रित केले आहे. इराणने डागलेले ड्रोन कसे निकामी करायचे, याचे प्रशिक्षण हे तज्ञ स्थानिक सैनिकांना देत आहेत.
अमेरिकेत...
ड ट्रंप यांच्या सहकाऱ्याचे त्यागपत्र
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रशासनातील दहशतवादविरोधी अधिकारी जो केंट यांनी मंगळवारी आपल्या पदाचा त्याग केला आहे. इराणकडून कोणताही धोका नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमेरिकेने इराणचे युद्ध इस्रायलच्या आग्रहामुळे स्वीकारले आहे, असा आरोपही त्यांनी त्यागपत्र देण्यापूर्वी केलेला आहे.
ड दूतावासांना अधिक सुरक्षेचा निर्णय
आखाती देशांमधील अमेरिकेच्या दूतावासांनाही इराण लक्ष्य करीत आहे. परिणामी, या सर्व दूतावासांची सुरक्षा अधिक भक्कम करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेच्या सर्व दूतावासांनी आणि व्यापारी दूतावासांनी त्यांच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि अहवाल द्यावा, असा आदेश दिला गेला.
इस्रायलमध्ये...
ड इस्रायलचा बसीजवर हल्ला
इस्रायलने बुधवारी इराणच्या बसीज सेनादलावर हल्ला केला आहे. ही इराणी सेना राजधानी तेहरानच्या आसपास नियुक्त करण्यात आली आहे. याच सेनेकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले इस्रायलवर आणि इतर अरब देशांवर केले जातात. या हल्ल्यांमध्ये या संस्थेचा प्रमुख नेता ठार झाला आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे.
ड क्षेपणास्त्र केंद्रांवरही हल्ला
इस्रायलने बुधवारी इराणच्या क्षेपणास्त्र केंद्रांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणची अनेक क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे, रडार व्यवस्था आणि इतर लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या हल्ल्यांमध्ये काही इराणी नागरीकांचा मृत्यू झाल्याची अनधिकृत माहितीही बुधवारी देण्यात आली.
इराकमध्ये...
ड अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला
इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या इराकमधील दूतावासाची काही प्रमाणात हानी झाली आहे. बुधवारी ंसकाळी हा हल्ला झाला. मात्र, इराणची अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावाही इराकने केला. इराकच्या किर्कुक येथील एका तळावरही इराणने ड्रोन हल्ला केला आहे.
ड इराकच्या टोळ्यांचाही सहभाग
इराकमधील काही अमेरिकाविरोधी टोळ्यांचा सहभाग अमेरिकेच्या इराकमधील आस्थापनांवरच्या हल्ल्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘सराया अवलिया अल् दाम’ नामक एका टोळीने अमेरिकेच्या एका व्यापारी दूतावासावरील हल्ल्याचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे. या संघटनेचा सहभाग अशा प्रकारे प्रथमच दिसून आलेला आहे.
लेबेनॉनमध्ये...
ड नागरीकांना घरे सोडण्याचा इशारा
दक्षिण लेबेनॉनमधील मोठ्या पट्ट्यातील लेबनीज नागरीकांना इस्रायलने घरे आणि निवासस्थाने सोडण्याचा इशारा बुधवारी दिला आहे. या भागांमध्ये इराण समर्थित हिजबुल्ला या संघटनेचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने इस्रायलने या भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले चालविलेले आहेत. त्यामुळे हा इशारा दिला गेला.
ड बेक्का खोऱ्यात सातत्याने हल्ले
लेबेनॉनमधील बेक्का खोऱ्यात इस्रायल सातत्याने बाँब हल्ले करीत आहे. या खोऱ्यातील समहार येथील चार घरांवर बुधवारी बाँब फेक करण्यात आली. या बाँबहल्ल्यात किमान चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती नंतर देण्यात आली. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात या भागात 100 हून अधिक ठार झाले आहेत.
ड कुवेतकडून हस्तकांना अटक
कुवेत या देशाच्या प्रशासनाने हिजबुल्लाच्या 14 हस्तकांना अटक केली आहे. हे हस्तक कुवेतमध्ये हल्ला करण्यासाठी सज्जता करीत होते, असा आरोप आहे. या 14 लोकांपैकी 12 कुवेतचेच नागरीक असून 2 लेबेनॉनचे आहेत. मात्र, हिजबुल्लाने कुवेतमध्ये आपले हस्तक असल्याचे वृत्त पूर्णत: फेटाळून लावले आहे.