ऊसदराविषयीची बैठक निष्फळ
निधीच्या कमतरतेमुळे मुख्यमंत्र्यांनी दाखवली हतबलता : एक हजार प्रोत्साहन धनावर शेतकरी ठाम
ऊसदर ठरविण्यासाठी सोमवारी सुवर्ण विधानसौधमधील सभागृहात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व त्यानंतर झालेली शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत शेतकरी नेत्यांनी सरकारने प्रतिटन 1 हजार रुपये प्रोत्साहन धन द्यावे, या मागणीवर जोर दिला. सरकारची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे लगेच निर्णय जाहीर करता येणार नाही. आर्थिक विभाग व कारखानदारांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठक आटोपती घेतली.
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव :
ऑक्टोबर रोजीच्या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारच्या बैठकीत जर निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेते शशिकांत गुरुजी यांनी आधीच दिला असून रविवारी सायंकाळपासून गुर्लापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. सोमवारची बैठक अनिर्णित ठरल्याने ऊसदर आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सध्या पाच गॅरंटी योजनांसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना सहावी गॅरंटी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कारखानदारांशी चर्चा केली. ही बैठकही कोणत्याही निर्णयाविना आटोपती घेण्यात आली. कारखानदारांनी आपल्या अडचणी सरकारसमोर मांडत कारखाने चालविणे कठीण आहे, हे सांगितले. अशा परिस्थितीत आम्हाला कारखाने चालवता येत नाहीत, असे सांगत सुमारे सात कारखानदारांनी आपल्याकडे चाव्या सुपूर्द करण्याची तयारी दर्शविल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कारखानदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विविध विकासकामांना चालना देण्यासाठी हेलिकॉप्टरने सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर पोहोचले. सौंदत्तीहून परतल्यानंतर सायंकाळी शेतकऱ्यांची बैठक सुरू झाली. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मण सवदी, चेलुवरायस्वामी, एम. बी. पाटील, संतोष लाड, रुद्राप्पा लमाणी, एस. एस. मल्लिकार्जुन, विजयानंद काशप्पण्णावर, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद, खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार राजू सेठ, एन. एच. कोनरे•ाr, आमदार एच. के. पाटील, आर. बी. तिम्मापूर आदींसह अनेक मंत्री, आमदार उपस्थित होते.शेतकरी नेते बडगलपूर नागेंद्र, चुन्नाप्पा पुजारी, सुनंदा जयराम, कुरबूर शांतकुमार, आमदार दर्शन पुट्टनय्या, चुक्की नंजुंडस्वामी, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार एल. के. अतिक, सरकारचे अप्पर मुख्य सचिव तुषार गिरीनाथ, गौरव गुप्ता, रितेषकुमार सिंग, अॅडव्होकेट जनरल, शशिकिरण शेट्टी आदींसह बेळगाव, बागलकोट, विजापूर, हुबळी-धारवाडसह राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी या बैठकीत भाग घेत साडेपाच हजार रुपये प्रतिटन दर घोषित करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बैठक सुरू असतानाच रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास विचार मांडण्यावरून शेतकरी नेत्यांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत गोंधळ आवरा, असे झाले तर आम्हीच निघून जातो, असे सांगितले. शेतकऱ्यांना आवरण्यासाठी बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांची एंट्री झाली. त्यावेळी पोलिसांनी या वादात प्रवेश करू नये, तेथून बाजूला व्हा, अशी सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
रात्री 8.30 वाजेपर्यंत चर्चा सुरूच होती. कोणत्याही परिस्थितीत निर्णय जाहीर करूनच बैठक आटोपती घ्या, या मागणीवर शेतकरी नेते ठाम राहिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी तुमच्याच बाजूने आहे, तुमच्या मागण्या पूर्ण करणे शक्य आहे का? याचा विचार करा. दुष्काळ आहे, केंद्र सरकारही आमच्यासोबत नाही. 29 व 30 ऑक्टोबर रोजी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती कर्नाटकात येणार आहे. या समितीसमोर आम्हाला म्हणणे मांडावे लागणार आहे. खिशात पैसे असले तरीच दर जाहीर करता येणार आहे. नसेल तर कोठून देऊ? असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
तुम्हाला मदत करण्यासाठीच बेळगावात बैठकीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरही आपण चर्चा केली आहे. केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा करावी लागणार आहे. साखरेचा दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगताच शेतकऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. तामिळनाडूत कसे शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा, राज्य सरकारकडून प्रतिटन एक हजार रुपये प्रोत्साहन धन जाहीर करावे, गुर्लापूरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे, असे सांगितले. यावर आताच जाहीर करा, पाच मिनिटात घोषणा करा, असे म्हणता येणार नाही. कारखानदारांशी व आर्थिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा करावी लागणार आहे. सरकारच्या आर्थिक अडचणी खूप आहेत. साखर कारखान्याविषयी अनेक तक्रारी मांडला आहात. त्यांच्यावरही नियंत्रण ठेवावे लागणार आहे. त्यामुळे कोणीही आताच घोषणा करा, अशी अपेक्षा धरू नका, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
शेतकरी नेते बडगलपूर नागेंद्र यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पंधरा मिनिटे वेळ द्यावा, चर्चा करून आमचा निर्णय कळवतो, त्यानंतर तुम्ही निर्णय जाहीर करा, अशी मागणी केली. याचवेळी बैठक संपल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सहकारी व आमदारांसह सुवर्ण विधानसौधमधून बाहेर पडले. त्यामुळे कोणत्याही निर्णयाविना कारखानदार व ऊसउत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली.
निर्णय न झाल्यास शेतकरी आंदोलन छेडण्यावर ठाम
शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी दर जाहीर करण्यासाठी सरकारला आम्ही काही तासांची मुदत दिली आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये चर्चा करून आम्ही पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत. त्यानंतरच मुख्यमंत्री ऊसदराबद्दल आपला निर्णय जाहीर करणार आहेत. जर निर्णय जाहीर झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचे आधीच ठरविले आहे, असे सांगितले. शेतकरी नेते कुरबूर शांतकुमार यांनीही मुख्यमंत्र्यांबरोबर आपण चर्चा करणार असल्याचे सांगितले.
