For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इटलीचा सिनेर सलग दुसऱ्यांदा मेलबर्नमध्ये अजिंक्य

06:53 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
इटलीचा सिनेर सलग दुसऱ्यांदा मेलबर्नमध्ये अजिंक्य
Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे झालेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉप सिडेड आणि विद्यमान विजेता जेनिक सिनेरने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद पुन्हा स्वत:कडे राखले. अंतिम सामन्यात सिनेरने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा तीन सेट्समधील लढतीत पराभव केला. या स्पर्धेत अमेरिकेची टेलर टाऊनसेंड आणि सिनियाकोव्हा यांनी महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.

इटलीचा 23 वर्षीय सिनेरने गेल्या वर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले होते. त्याच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद होते. 2025 च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सिनेरने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दर्जेदार खेळाचे दर्शन घडवित अनेक अव्वल खेळाडूंना पराभूत करत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात सिनेरने व्हेरेवचा 6-3, 7-6 (7-4), 6-3 अशा सेट्समध्ये फडशा पाडला. या जेतेपदामुळे सिनेरने एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. गेल्या जूनपासून सिनेर एटीपी मानांकनात अग्रस्थानावर आहे. एटीपीच्या मानांकनात पहिल्या दोन क्रमांकावरील टेनिसपटूंमध्ये 2019 नंतर पहिल्यांदाच यावेळी अंतिम सामना खेळविला गेला. 2019 साली सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचने द्वितीय मानांकित स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला होता. 1992-93 नंतर या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविणारा 23 वर्षीय सिनेर हा तरुण टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी जिम कुरियरने असा पराक्रम 1992-93 साली केला होता. 2024 च्या टेनिस हंगामापासून सिनेरने आतापर्यंत 5 प्रमुख स्पर्धा जिंकल्या असून त्यामध्ये 3 ग्रँडस्लॅम स्पर्धांचा समावेश आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये सिनेरने अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.

Advertisement

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत यावेळी उपांत्य लढतीत जोकोविचला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने व्हेरेवला अंतिम फेरीत संधी मिळाली होती. अंतिम सामन्यात सिनेरच्या तुलनेत व्हेरेव्हची सर्व्हिस अधिक वेगवान नोंदवली गेली आहे. पहिल्या सेटमध्ये सिनेरने बेसलाईन खेळावर भर देत व्हेरेव्हला वारंवार नेटजवळ खेचले. व्हेरेवकडून वारंवार चुका झाल्याने त्याला या सेटमध्ये केवळ 3 गेम्स जिंकता आले. दुसरा सेट मात्र टायब्रेकरपर्यंत लांबला. पण सिनेरने टायब्रेकरमध्ये व्हेरेवला पुन्हा पराभूत करत दोन सेट्सची आघाडी मिळवली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये व्हेरेवकडून सिनेरला फारसा प्रतिकार झाला नाही. त्यामुळे सिनेरने हा शेवटचा सेट 6-3 असा जिंकून दुसऱ्यांदा चषकावर आपले नाव कोरताना व्हेरेवचे आव्हान संपुष्टात आणले.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेची टेलर टाऊनसेंड आणि कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी तृतीय मानांकित जोडी हेस वेई आणि ओस्टापेंको यांचा 6-2, 6-7 (4-7), 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. टाऊनसेंडला झेकच्या सिनियाकोव्हाकडून चांगलीच साथ या लढतीत मिळाली. टेलर आणि सिनियाकोव्हा या जोडीचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या दोघींनी गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तर अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

Advertisement
Tags :

.