इस्रायलमध्ये नेतान्याहू युती आघाडीवर
मात्र, दोन्ही आघाड्या बहुमतापासून वंचित राहणार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या देशाचे विद्यमान नेते बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वातील युतीने आघाडी मिळविली आहे. तथापि, ही युती बहुमतापासून दूर राहणार, हे देखील निश्चित झाले आहे. आत्तापर्यंत 90 टक्के मतांची गणना झाली असून नेतान्याहू यांच्या आघाडीला 53 जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीला 48 जागा मिळणार असून अरब पक्षांना 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे. अद्याप सर्व मतांची गणना झालेली नसल्याने या जागांमध्ये किंचित भिन्नता अंतिम परिणामांमध्ये येऊ शकते, अशी स्थिती आहे. त्रिशंकू संसद निर्माण झाल्याने सरकार स्थापनेला विलंब होणार आहे. संसद ‘नेसेट’ मध्ये 120 जागा असून बहुमतासाठी 61 जागा आवश्यक आहेत.
नेतान्याहू यांच्या नेतृत्वातील लिकुड पक्षाला 24 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी यशर पक्षाला 20 च्या आसपास जागा मिळणे शक्य आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये दोन्ही आघाड्या जवळपास समान पातळीवर राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, नेतान्याहू यांच्या आघाडीला या सर्वेक्षणांमध्ये अनुमानित केलेल्या जगांपेक्षा काही जागा अधिक मिळताना दिसत आहेत. अद्याप इस्रायलच्या सैनिकांच्या पोस्टल मतांची गणना करायची राहिलेली आहे. अंतिम परिणाम समोर येण्यास अद्याप काहीसा वेळ लागणे शक्य आहे.
युद्धाची पार्श्वभूमी
7 ऑक्टोबर 2024 या दिवशी इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेने घातक हल्ला करुन 1,200 निरपराध ज्यू नागरीकांची हत्या केली होती. महिलांवर अत्याचार केले होते आणि 400 हून अधिकांचे अपहरण केले होते. त्यामुळे इस्रायलनेही पॅलेस्टाईविरोधात युद्ध पुकारले होते. या युद्धाची पार्श्वभूमी या निवडणुकीला होती. इस्रायलची जनता नेतान्याहू यांच्यावर संतापली आहे, असा प्रचार करण्यात येत होता. नेतान्याहू यांच्या आघाडीच्या काही जागा या निवडणुकीत कमी झाल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या युतीला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, आता सत्तास्थापनेसाठी मोठी कसरत दोन्ही बाजूंना करावी लागेल.
बुधवारी रात्रीपर्यंतचे संभाव्य पक्षीय बलाबल
एकंदर जागा 120 (बहुमतासाठी 61)
नेतान्याहू नेतृत्वातील युती
लिकुड पक्ष 26
ओझमा 7
युटीजे 7
शास पक्ष 7
रेल झेनोनिस्ट 6
एकंदर संभाव्य 53
विरोधी आघाडी
यशर 21
बियाचड 12
डेमॉक्रॅटस् 8
बेटेनू 7
एकंदर 48
अरब पक्ष
जॉइंट लिस्ट 12
राआम 7
एकंदर 19