अमेरिका-इराणदरम्यान मध्यस्थांद्वारे चर्चा
अमेरिकेने दबाव घटविल्यास होर्मुझ खुला करू : इराणने चर्चेदरम्यान ठेवली अट
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांदरम्यान सुमारे 3 तासांपर्यंत चर्चा झाली आहे. या चर्चेत अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव विटकॉफ आणि इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची सामील झाले. तर कतारच्या अधिकाऱ्यांनी या चर्चेकरता मध्यस्थी केली आहे. चर्चा चांगली राहिली असून दोन्ही देशांची लवकरच आणखी एक बैठक होणार असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
अमेरिकेने सैन्य आणि आर्थिक दबाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याची तयारी दर्शविल्यास इराण 7 दिवसांच्या आत होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुला करू शकतो असे इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मध्यस्थांद्वारे चर्चा
इराणच्या अधिकाऱ्यांशी थेट भेट झालेली नाही. अमेरिका आणि इराणदरम्यान मध्यस्थांद्वारे चर्चा झाली आहे. मध्यस्थ पूर्ण दिवस अमेरिका आणि इराणदरम्यान संदेशांची देवाणघेवाण करत राहिले. चर्चेची एक फेरी पूर्ण झाली असून मध्यस्थ यापुढे देखील दोन्ही बाजूंदरम्यान काम जारी राखतील असे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी विटकॉफ यांनी चर्चेनंतर सांगितले. चर्चेत ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर देखील सामील होते.
करार करा, अन्यथा नष्ट करू
इराणकडे आता दोन मार्ग आहेत, अमेरिकेसोबत करार करावा किंवा गंभीर सैन्य कारवाईसाठी तयार रहावे. इराणसोबत करार न झाल्यास आणि संघर्ष जारी राहिल्यास अमेरिका इराणला उद्ध्वस्त करू शकतो. अमेरिकेसमोर शांतता करार किंवा पुन्हा सैन्य कारवाईचा पर्याय आहे. अमेरिका स्वत:च्या सामर्थ्याद्वारे शांतता प्रस्थापित करू इच्छितो असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच त्यांनी इराणला चर्चेची तयारी दर्शविण्याची आणि होर्मुझ मार्ग पुन्हा खुला करण्याची सूचना केली.
इराणकडून अमेरिकेसमोर अटी
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी स्वत:च्या अटी अमेरिकेसमोर मांडल्या आहेत. विदेशमंत्री अराघची यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर या अटींचा उल्लेख केला. अमेरिकेने त्वरित सागरी नाकाबंदी हटवावी, विदेशात गोठविलेली इराणची संपत्ती जारी करावी, तसेच लेबनॉन समवेत सर्व आघाड्यांवरील युद्ध समाप्त करावे अशा इराणच्या अटी आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वपूर्ण तेलवाहतुकीच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. पर्शियनचा उपसागर आणि ओमानच्या उपसागराला जोडणाऱ्या या जलमार्गातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होत असते.