अन्न वाया जाऊ नये म्हणून…
06:00 AM Oct 01, 2021 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
अनेकदा शिळ्या अन्नाचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. उरलेले अन्न टाकवतही नाही आणि कुणी खातही नाही. म्हणूनच अन्न वाया जाऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेतलेली बरी. त्यासाठी योग्य नियोजनाबरोबरच अन्न जास्तीत जास्त कसे टिकेल याची काळजीही घेणे आवश्यक आहे.
Advertisement
- खरेदी योग्य असावी : आठवडाभराच्या खाण्याचे नियोजन तुम्हाला करता आले तर त्यासारखी दुसरी सुविधा नाही. ते केल्यावर त्यानुसार खरेदी करा. गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नका. तुमच्या नियोजनानुसारच खाद्यपदार्थ बनवा नाहीतर सगळे वाया जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ तुम्ही पनीर खरेदी केलेत आणि त्यापासून पदार्थच बनवला नाहीत तर पनीर खराब होऊन टाकून द्यावे लागेल. दर तीन-चार दिवसांनी फ्रीजची सफाई करताना त्यात काय काय आहे हे दिसेल आणि ते तुम्हाला संपवता येईल. यामुळे कोणताही पदार्थ खराब होणार नाही.
- आवश्यक तेवढेच वाढा : जेवढी भूक आहे तेवढेच वाढा. आग्रह करून जास्त वाढू नका. विशेषतः लहान मुले पानात अन्न टाकतात. त्यामुळे जेवायला बसलेल्या व्यक्तीला जेवढी भूक आहे तेवढेच वाढा.
- पदार्थांवर लावा लेबल : बाजारातून तुम्ही जे पदार्थ, गोष्टी आणता त्यावर तो पदार्थ किती दिवसांत संपवायचा आहे याचे सरळ लेबल लावा. म्हणजे तो पदार्थ लवकरात लवकर संपवण्यासाठी तुम्ही रेसिपी बनवाल. समजा तुम्ही मैदा आणला असेल तर तो साधारण महिन्याच्या आत संपवायला हवा. नाहीतर त्यात आळ्या, जाळ्या व्हायची शक्यता असते.
- पदार्थ टिकाऊ बनवा : कोणताही पदार्थ टिकून राहण्याचे निश्चित असे एक तापमान असते. त्या तापमानावर तो पदार्थ ठेवला तर पुढील आठ तासापर्यंत तो तुम्ही खाऊ शकता. कच्च्या पदार्थांपेक्षा शिजवलेल्या पदार्थांत जिवाणू वाढण्याची शक्यता असते.
- पदार्थ तयार केल्यावर चार तासांच्या आत तो फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवलेला भात सामान्य तापमानावर आणून खा, गरम करून नाही.
- गोठलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवूनच वितळवा, बाहेर काढून नाही.
- सुका मेवा घरी आणल्यावर तो थोडा भाजून फ्रीजमध्ये ठेवा. त्याची चव आणि गंध खराब होणार नाही आणि तो जास्त दिवस टिकेल.
Advertisement